
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
महाराष्ट्रातील अंगणवाड्यांमधून दिल्या जाणाऱ्या पोषण आहारात दररोज तब्बल 64 लाख रुपयांचा गैरव्यवहार होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. केंद्रीय महिला व बालविकास मंत्रालयाने दिलेल्या अहवालानुसार महाराष्ट्रातील एक लाख अंगणवाडय़ांमधील तब्बल आठ लाख लाभार्थी विद्यार्थ्यांची नावे बोगस असल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे या अंगणवाड्यांमध्ये शिजतंय तरी काय?
उत्तर प्रदेशमधील अंगणवाडय़ांत 14 लाख बोगस विद्यार्थ्यांची नोंदणी असल्याचे नुकतेच समोर आले आहे. त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील अंगणवाडय़ांमध्ये किती विद्यार्थी आहेत, त्यात बोगस विद्यार्थ्यांची संख्या किती, याचा केंद्रीय महिला व बालविकास विभागाने शोध घेतला आहे. त्यासाठी अंगणवाडय़ांमध्ये नोंदणी असलेल्या लाभार्थ्यांची नावे आधारशी लिंक केली असता आठ लाख बोगस नावांची नोंदणी केल्याची माहिती समोर आल्याचे महिला व बालविकास विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. प्रशासनाने त्याची गंभीर दखल घेतली असून बोगस लाभार्थ्यांचा शोध घेण्याचे काम सुरू असून ती नावे तत्काळ वगळली जातील, असेही त्या अधिकाऱ्याने सांगितले.
एका विद्यार्थ्याच्या पोषण आहारावर दररोज आठ रुपये खर्च
अंगणवाडीत नोंदणीकृत असलेल्या लाभार्थी विद्यार्थ्याच्या पोषण आहारावर दररोज आठ रुपये खर्च केला जातो. त्यासाठी केंद्रीय महिला व बालकल्याण विकास मंत्रालयाकडून चार रुपये 80 पैसे तर राज्य सरकार 3 रुपये 20 पैसे देते.
असा होतो 64 लाखांचा गैरव्यवहार
महाराष्ट्रातील अंगणवाड्यांमध्ये 61 लाख लाभार्थी विद्यार्थ्यांची नोंदणी आहे. त्यापैकी प्रत्यक्षात आठ लाख विद्यार्थ्यांची नावे बोगस आहेत. त्यामुळे एका विद्यार्थ्याच्या पोषण आहारावर दिवसाला आठ रुपये खर्च होत असल्याने बोगस आठ लाख नावांचा विचार करता दररोज 64 लाख रुपयांचा गैरव्यवहार होतो.
























































