कांद्याला 1 रुपये 50 पैसे प्रतिकिलो भाव, शेतकऱ्याने मुख्यमंत्र्यांना पाठविली 310 रुपयांची मनिऑर्डर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, सटाणा

निफाड येथील कांदा उत्पादक शेतकरी संजय साठे यांच्या कांद्याला निचांक भाव मिळाल्याने त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 1118 रुपयांची मनिऑर्डर केली. हे प्रकरण ताजे असतानाच कंधाणे येथील शेतकरी रवींद्र भावराव बिरारी यांचा कांदा अवघ्या 1 रुपये 50 पैसे प्रतिकिलो विकला गेल्याने त्यांनी 310 रुपयांची मनिऑर्डर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवून शासनाचा निषेध केला आहे.

बागलाण तालुक्यातील कंधाणे येथील कांदा उत्पादक शेतकरी रवींद्र बिरारी यांचा कांदा विक्रीसाठी सटाणा कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात 12 डिसेंबर रोजी विक्रीसाठी आणला होता. बिरारी यांच्या कांद्याला सरासरी 1 रुपया 50 पैसे किलो प्रतिकिलो भाव मिळाला. यामुळे संतप्त कांदा उत्पादक शेतकरी बिरारी यांनी काल आपल्या ट्रालीमधील कांदा रस्त्यावर आंदोलनाच्या ठिकाणी ओतला, तर ट्रालीमधील दुसरा शिल्लक असलेला कांदा विक्रीसाठी आणलेल्या कांदा विकून 2370 रुपये त्यांच्या हातात मिळाले. कांदा विक्रीसाठी आणलेल्या ट्रक्टरला त्यांना दोन हजार रुपये भाडे अदा करावे लागले. यामुळे संतापलेल्या बिरारी यांनी शिल्लक असलेले 370 रुपयांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र पडणवीस यांना राज्याचे कर्ज परतफेड करण्यासाठी मनिऑर्डर केली.

बागलाण तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकरी घसरलेल्या कांदा दराने पुरता हादरला आहे. उत्पादन खर्च तर सोडाच, वाहतूक अन् हमाली खर्चदेखील वसूल होत नसल्याने त्रस्त आहेत.