अग्निशमन यंत्रणा ठप्प, ‘ओसी’देखील नाही; जीव धोक्यात घालून काम कसे करणार?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, मुंबई

अग्निशमन यंत्रणा ठप्प असल्यामुळेच अंधेरीच्या कामगार रुग्णालयात आगीचा भडका उडाल्याचे समोर आल्यामुळे आता कामगारांमध्ये भीतीची दहशत पसरली आहे. जीक धोक्यात घालून काम कसे करणार, असा सवाल कामगार विचारत आहेत. अग्निशमन यंत्रणा बसविण्यासाठी गेल्या अनेक महिन्यांपासून पाठपुरावा करूनही केंद्र सरकारच्या अखत्यारीत असणाऱ्या रुग्णालय प्रशासनाने कार्यवाही केली नसल्याचा आरोप करीत शेकडो कर्मचाऱ्यांनी रुग्णालयाच्या आवारातच ठिय्या मांडला. दरम्यान, या आगीतील मृतांचा आकडा आठवर गेला आहे.

कामगार रुग्णालयात सोमवारी लागलेल्या भीषण आगीत तब्बल आठ जणांचा बळी गेल्याने कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष करणाऱ्या प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. 350 खाटांइतकी मोठी क्षमता असणाऱ्या रुग्णालयात फायर फायटिंग व्यवस्था नसल्यामुळे या इमारतीला भोगवटा प्रमाणपत्र दिले नसल्याचेही समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर गेल्या अनेक महिन्यांपासून रुग्णालयाच्या ‘ईएसआयसी’ मेडिकल एम्प्लॉईज युनियनच्या माध्यमातून नॅशनल बिल्डिंग कन्स्ट्रक्शन कॉर्पोरेशनकडे (एनबीसीसी) पाठपुरावा सुरू होता. यासाठी अनेक निवेदनही देण्यात आली, मात्र याकडे दुर्लक्ष केल्यामुळेच आठ जणांचा बळी गेल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. ‘एनबीसीसी’च्या बेजबाबदारपणाचा कर्मचाऱ्यांनी फलक झळकावून निषेध केला. उपचार घेण्यासाठी येणाऱ्या रुग्णांचा आणि उपचार करणाऱ्यांच्याच जिवाला जर धोका असेल तर आम्ही काम तरी कसे करणार, असा सवाल कर्मचाऱ्यांनी केला.

दोन महिने रुग्णालय बंद राहणार

आगीच्या घटनेनंतर संपूर्ण कामगार रुग्णालय रिकामे करण्यात आले आहे. रुग्णालय पूर्ण सुस्थितीत आणण्यासाठी किमान दोन महिन्यांचा कालावधी लागणार आहे, मात्र या रुग्णालयात काम करणाऱ्या एक हजार कर्मचाऱ्यांचे समायोजन कुठे करणार याबाबत प्रशासनाने अद्याप कोणतीही माहिती दिलेली नसल्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये सध्या संभ्रमाचे वातावरण आहे.

आस्थापनांनी जबाबदारी घ्यायलाच हवी

इमारती आणि आस्थापनांना एनओसी देताना फायर फायटिंगची व्यवस्था कार्यक्षम ठेवण्याची जबाबदारी संबंधितांची असल्याची अट कायद्यानुसार घालण्यात येते, मात्र अनेक सोसायटय़ा-आस्थापनांकडून याकडे दुर्लक्ष केले जात असल्यामुळेच दुर्घटनांमध्ये जीवितहानी काढत असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले. केंद्र सरकारच्या अखत्यारीत येणाऱ्या कामगार रुग्णालयाला ओसी नसल्याचेही समोर आल्यामुळे पुन्हा ग्लास फसाड (काचेची तावदाने) लावणाऱ्या इमारतींचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

मृतांच्या कुटुंबीयांना  दहा लाखांची मदत

कामगार रुग्णालयाला लागलेल्या आगीत मृत पावलेल्यांच्या कुटुंबीयांना केंद्र सरकारने दहा लाखांची मदत जाहीर केली आहे. तर गंभीर जखमी झालेल्यांना दोन लाख आणि इतर जखमी झालेल्यांना एक लाखाची मदत जाहीर करण्यात आली आहे. केंद्रीय श्रम व रोजगार मंत्री संतोष गंगवार यांनी आज ही घोषणा केली.

ऑपरेशनची तारीख पुढे ढकलल्यामुळेच मृत्यू

आसाराम मगरे 30 नोव्हेंबरपासून कामगार रुग्णालयात उपचार घेत होते. त्यांच्या ऑपरेशनची तारीख तीन वेळा पुढे ढकलण्यात आली, मात्र यामुळे सोमवारच्या आगीच्या ते भक्ष्यस्थानी सापडले. अग्निशमन दलाने त्यांना तातडीने बाहेर काढून सेव्हन हिल्स रुग्णालयात दाखल केले, मात्र त्यांचा मृत्यू झाला होता. ऑपरेशनची तारीख पुढे ढकलली नसती तर आपल्या वडिलांचा जीव वाचला असता, असे मृत आसाराम मगरे यांचा मुलगा आनंद मगरे यांनी सांगितले.

चिमुकलीचं नावदेखील ठेवलं नव्हतं!

कामगार रुग्णालयातील आगीत आमच्या कुटुंबातील दोन महिन्यांच्या चिमुकलीचाही दुर्दैवी मृत्यू झाला. आम्ही अद्याप तिचं नावदेखील ठेवलं नव्हतं. या चिमुकलीची आई 14 नोव्हेंबरपासून रुग्णालयात उपचार घेत होती. आग लागली तेव्हा चिमुकलीची आई आणि आत्यादेखील होती. या आगीत आई रुख्मिणी यादव गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर सेव्हन हिल्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत, तर आत्यावर कूपर रुग्णालयात उपचार सुरू आहेत- सुभाष यादव, (चिमुकलीचा काका)

तो फोन आला आणि…

पोटाच्या विकारावर उपचार करण्यासाठी पत्नी आरतीला कामगार रुग्णालयात दाखल केले होते. तिच्यासोबत माझ्या दोन्ही मुली होत्या. 4 वाजता माझी मोठी मुलगी पूजाचा फोन आला की रुग्णालयात आग लागली आहे. रुग्णालयाच्या ठिकाणी धाव घेतल्यावर दुसरी मुलगी प्रियादेखील जखमी झाल्याचे समजले. मात्र पत्नीचा ठावठिकाणा लागत नव्हता. मात्र आरती इमारतीवरून पडल्याने मृत झाल्याचे समजल्यानंतर धक्काच बसला. आता एका मुलीवर कूपर तर एका मुलीवर सेव्हन हिल्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत- सुरेश कोठारकर

दहा वर्षांत 614 जणांचा बळी

मुंबईतील किती रुग्णालये, आस्थापनांच्या इमारतींमध्ये फायर फायटिंग व्यवस्था कार्यान्वित आहे याबाबत अग्निशमन दलाकडे माहिती मागितली, मात्र अशी आकडेवारी नसल्याचे सांगण्यात आले. यावरून लागणाऱ्या आगींबाबत प्रशासन गंभीर नसल्याचे दिसून येते. मुंबईत गेल्या दहा वर्षांत लागलेल्या आगीत 614 जणांना बळी गेला आहे. त्यामुळे प्रशासनाने याची गंभीर दखल घेऊन प्रत्येक इमारत आणि आस्थापनांमध्ये अग्निशमन यंत्रणा सक्षमपणे तैनात ठेवण्यासाठी गांभीर्याने कार्यवाही केली पाहिजे-शकील अहमद शेख, माहिती अधिकार कार्यकर्ता