अंधेरीच्या कामगार रुग्णालयाला पुन्हा आग, इलेक्ट्रिक बॉक्स पेटला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

कामगार रुग्णालयाला सोमवारी लागलेली भीषण आग विझते न विझते तोच आज पुन्हा एकदा याच रुग्णालयात मीटर बॉक्सला आग लागली. संध्याकाळी पावणे आठच्या सुमारास आग लागल्याचा कॉल आल्यानंतर अग्निशामक दलाचा ताफा तातडीने घटनास्थळी दाखल झाला व काही मिनिटांत आग विझवली.

दोनच दिवसांपूर्वी कामगार रुग्णालयात शॉर्टसर्किटमुळे आग लागली. या आगीतील जखमी अजून धक्क्यातून पुरते सावरत नाहीत तोच आज पुन्हा मीटर बॉक्सला आग लागली. त्यामुळे रुग्णालयाच्या विद्युत यंत्रणेविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. आज अचानक पुन्हा लागलेल्या आगीमुळे यंत्रणांची चांगलीच पळापळ झाली. अग्निशामक दलाच्या तीन गाडय़ा, अदानी एनर्जीचे कर्मचारी, पोलीस, वॉर्ड ऑफिसमधील स्टाफ घटनास्थळी दलाच्या तीन गाडय़ा, अदानी एनर्जीचे कर्मचारी, पोलीस, वॉर्ड ऑफिसमधील स्टाफ घटनास्थळी दाखल झाले. मात्र ही आग काही मिनिटातच विझवण्यात अग्निशामक दलाला यश आले. दोनच दिवसांपूर्वी लागलेल्या आगीमुळे रुग्णालय पूर्ण रिकामे करण्यात आले होते.

रस्त्यावरच्या खांबावरून वीज घेतली
रुग्णालयाची वीज जोडणी कापण्यात आलेली असून इमारत परिसरात उजेडासाठी रस्त्यावरच्या विजेच्या खांबावरून वीज घेण्यात आली होती असे समजते. त्यामुळेच ही आग लागल्याचे बोलले जात आहे.

कामगार रुग्णालय अपघातातील रुग्णांना ‘बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर रुग्णालय’ येथे दाखल करण्यात आले आहे. येथील रुग्णांची विचारपूस करताना खासदार चंद्रकांत खैरे. सोबत आमदार रमेश लटके, नगरसेवक अनंत (बाळा) नर, शाखाप्रमुख नंदकुमार ताम्हणकर आदी.