ज्येष्ठ पत्रकार कृ. पां. सामक यांचे निधन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, मुंबई

ज्येष्ठ पत्रकार व मुंबई मराठी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष कृष्णराव पांडुरंग उर्फ कृ. पां. सामक यांचे आज वृद्धापकाळाने ठाणे येथे निधन झाले. त्यांचा जन्म 5 फेब्रुवारी 1922 रोजी झाला.कृ. पां. सामक यांनी काही काळ कापड गिरणीत नोकरी केली होती. मात्र स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांच्या सांगण्यावरून त्यांनी पत्रकारितेचा प्रारंभ केला. 1945 साली सांगली येथील साप्ता. विक्रममध्ये त्यांनी लिखाण केले. त्यानंतर त्यांनी, प्रभात, लोकमान्य, गावकरी, नवशक्ती, लोकसत्ता या दैनिकांत काम केले. लोकसत्तामधून मुख्य वार्ताहर म्हणून 1980 साली ते निवृत्त झाले.

राजकीय आणि सामाजिक जाण असलेला पत्रकार म्हणून सामक यांची ख्याती होती. 1970-1971 या काळात ते मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष होते. त्यांच्या कारकिर्दीतच मुंबई मराठी पत्रकार संघ आणि शेजारील प्रेस क्लब या दोन संस्थांना आझाद मैदान येथे वास्तू मिळवून घेण्यात ते यशस्वी झाले होते. त्यांच्या पुढाकारानेच मंत्रालय विधिमंडळ वार्ताहर संघाची स्थापना झाली. सामक यांना ‘चंद्रकांत व्होरा, ‘अनंत हरि गद्रे’, ‘ग. गो. जाधव’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्यांच्या पश्चात 1 मुलगा, 2 मुली, 2 जावई आणि नातवंडे असा परिवार आहे. मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वाबळे यांनी कै. सामक यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त करताना म्हटले आहे की, साठच्या दशकामध्ये नव्याने निर्माण झालेल्या महाराष्ट्र राज्याची होणारी जडणघडण जवळून पाहणारे सामक हे साक्षीदार होते. या मंतरलेल्या काळात पत्रकारितेमध्ये त्यांनी महत्त्वाचे योगदान केले असे वाबळे म्हणाले.