
सामना प्रतिनिधी । मुंबई
‘ईव्हीएम’ हटवून मतपत्रिकेद्वारे मतदान घेण्याची पद्धत पुन्हा लागू करण्यासाठी विरोधी पक्ष वारंवार मागणी करीत आहेत. मात्र त्यांनी काहीही केले तरी मोदी सरकार ‘ईव्हीएम’ला कवटाळून बसणार असून लोकसभेची निवडणूक ‘ईव्हीएम’द्वारेच घेतली जाणार असल्याचे आज स्पष्ट झाले. ‘ईव्हीएम’मध्ये ‘गडबड-घोटाळा’ करता येत नाही, हे जनतेच्या गळी उतरवण्यासाठी निवडणूक आयोग कामाला लागला आहे.
येत्या 25 डिसेंबरपासून तब्बल 45 दिवस म्हणजे दीड महिना निवडणूक आयोग महाराष्ट्रात ‘ईव्हीएम’ त्यातून राज्यातील गावागावात जाऊन ‘ईव्हीएम’ हे किती सुरक्षित आणि विश्वसनीय आहे, हे जनतेला पटवून देण्यात येणार आहे.
‘ईव्हीएम’द्वारे घेतल्या जणाऱया मतदानाबाबत अनेक प्रकारच्या तक्रारी दर निवडणुकीतून समोर आल्या आहेत. मतदाराने कोणत्याही चिन्हासमोरचे ‘बटण’ दाबले तरी मत मात्र भाजपच्या कमळालाच जाते. तसा अनुभव बऱयाच मतदारांना सर्वत्र आलेला आहे. त्यातून राजकीय पक्ष आणि उमेदवार निवडणुकीतील आपल्या पराभवाला ‘ईव्हीएम’मधील घोटाळाच कारणीभूत आहे असा आरोप नेहमीच करीत आले आहेत. त्यामुळे विरोधी पक्षांनी ईव्हीएम हटवण्याची मागणी सतत चालवली आहे.
लोकसभा निवडणूक ईव्हीएमऐवजी मतदान पत्रिकेद्वारे घेतली जावी, याबाबत विरोधी पक्ष आग्रही राहिले आहेत. पण मोदी सरकार या प्रश्नावर विरोधी पक्षांना मुळीच जुमानणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
काँग्रेसच्या ताज्या विजयाला बनवले आयोगाने ढाल
मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड या तीन राज्यांत भाजपला हटवून काँग्रेस सत्तेवर आली आहे. काँग्रेसचा हा विजय विरोधी पक्षांच्या ‘ईव्हीएम हटाव’ची मागी हाणून पाडण्यासाठी वापरला जात आहे. त्या राज्यांत सत्तांतर झाले नसते तर निवडणुकीतील पराभवाचे खापर पुन्हा ‘ईव्हीएम’वर फोडले गेले असते, असे निवडणूक आयोगातील एक अधिकारी म्हणाला. त्यामुळे ‘ईव्हीएम’ कायम राखण्यासाठी काँग्रेसच्या तीन राज्यांतील विजयाचा ढालीसारखा वापर करण्याची मोदी सरकारचा इरादा स्पष्ट झाला आहे. येत्या लोकसभा निवडणुकीवेळी ईव्हीएमवर आरोप होऊ नयेत म्हणून निवडणूक आयोग थेट मतदारांमध्ये जाणार आहे. ‘ईव्हीएम’बाबत लाकांच्या मनात असलेल्या शंकांचे निरसन जनजागृतीद्वारे केले जाईल, असे निवडणूक आयोगाचे म्हणणे आहे.
‘ईव्हीएम’च्या मुद्दय़ावर तर काँग्रेस सोयीची भूमिका घेत आली आहे. निकाल विरोधात गेले की ईव्हीएमविरोधात ओरड करायची. निकाल आपल्या बाजूने लागले की गप्प बसायचे असे सोयीचे राजकारण काँग्रेस करते.
– नरेंद्र मोदी, पंतप्रधान




























































