‘वर्षा’ बंगल्यावर धडकले गिरणी कामगार, पोलिसांची तारांबळ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

घरांच्या मागणीसाठी आक्रमक झालेल्या गिरणी कामगारांनी बुधवारी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘वर्षा’ बंगल्यावरच धडक दिली. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपच्या मंत्र्यांची बैठक सुरू असतानाच हा मोर्चा धडकल्याने पोलिसांची एकच तारांबळ उडाली. परिस्थिती चिघळण्याच्या आत भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी गिरणी कामगारांचे प्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिल्यामुळे तणाव निवळला.

गिरणी कामगारांच्या मागण्या ऐकून घेतल्यावर मुख्यमंत्र्यांशी यावर चर्चा करू आणि संबंधित अधिकाऱ्यांसोबत 26 डिसेंबरला दुपारी चार वाजता सह्याद्री बंगल्यावर गिरणी कामगारांची बैठक बोलावण्यात येईल, असे आश्वासन प्रसाद लाड यांनी दिले. सर्व गिरणी कामगारांना घरे मिळण्याच्या प्रमुख मागणीसह म्हाडाच्या घरांची लॉटरी प्रक्रिया त्वरित राबवण्यात यावी व एमएमआरडीएच्या अकरा हजार घरांची लॉटरी त्वरित काढण्यात यावी आदी प्रमुख मागण्यांसाठी गिरणी कामगारांनी वर्षा बंगल्यावर मोर्चा काढला.