ट्रेनमध्ये प्रवासाबरोबर करा मनसोक्त शॉपिंग

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन। नवी दिल्ली

शॉपिंगची आवड असणाऱ्यांसाठी खुशखबर आहे. तुम्हांला आता रेल्वे प्रवासातही हव्या त्या वस्तूंची शॉपिंग करता येणार आहे. कारण रेल्वे लवकरच लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये वेगवेगळ्या वस्तूंची विक्री करणार आहे. नववर्षाच्या सुरुवातीला म्हणजेच जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात ही सुविधा प्रवाशांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात ही सेवा फक्त पश्चिम रेल्वेच्या लांब पल्ल्याच्या 16 गाड्यांमध्ये असणार आहे. यासाठी मेसर्स एचबीएन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीबरोबर रेल्वेने 5 वर्षासाठी 3.66 कोटी रुपयांचा करार केला आहे.

अनेकवेळा रेल्वेमध्ये फेरीवाले लहान मोठ्या वस्तू विकण्यासाठी येतात. त्यात बऱ्याचवेळा स्वस्त वस्तू ज्यादा दराने विकून ते प्रवाशांकडून पैसे उकळतात. पण आता रेल्वेच्या या निर्णयामुळे या फेरीवाल्यांनाही चपराक बसणार आहे. तसेच ज्या बोगींमध्ये वस्तू विक्रीसाठी ठेवण्यात येतील तेथे रेल्वेचे दोन सेल्समनही असणार आहेत. त्यांसाठी त्यांना ओळखपत्र व गणवेशही देण्यात येणार आहे. या सेल्समनची ओळखपत्र तपासण्याचे स्वातंत्रही प्रवाशांना असणार आहे.

रेल्वेत विक्रीस ठेवण्यात आलेल्या उत्पादनांमध्ये प्रामुख्याने सौंदर्य प्रसाधने, घरोपयोगी वस्तू, फिटनेससाठी आवश्यक वस्तू व अनेक गृहोपयोगी वस्तू ठेवण्यात येणार आहेत. पण तंबाखू व तंबाखूजन्य वस्तूंच्या विक्रीवर मात्र बंदी आहे. सकाळी 8 ते रात्री 9 पर्यंत रेल्वेतील ही दुकान प्रवाशांसाठी खुली असणार आहेत.