
>>डॉ. शुभांगी महाजन<<
आजोबा म्हणजे एक ठरावीक चित्र समोर येतं. यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा भाग असतो डोक्यावरील विरळ किंवा चक्क नाहीशा झालेल्या केसांचा… टक्कल पडणे ही हिंदुस्थानी पुरुषांची विशेषतः ज्येष्ठ पुरुषांची एक सर्वसाधारण समस्या. पण आपल्या दैनंदिनीत थोडाफार बदल केला आणि माथ्यावरील त्वचेची काळजी घेतली तर आजोबाही आपले केस राखू शकतात. रुबाबदार दिसू शकतात.
शरीरात वयानुसार हार्मोन्सचे बदल होतातच. पण त्या हार्मोन्सचा परिणाम केसांच्या मुळावर होऊ नये यासाठी काही गोळ्या चालू ठेवता येतात. या गोळ्यांनी नवे केस येतीलच याची हमी नसते, पण डोक्यावर शिल्लक असलेले केस जाणार नाहीत याची खात्री देता येते. या सगळ्या उपचारपद्धती करण्याआधी रुग्णाची रक्ताची चाचणी केली जाते. त्यानुसारच रुग्णाला कोणती उपचारपद्धती कितपत फायदेशीर ते ठरवले जाते. केसगळती ही केसांच्या साईड भागापासून सुरु होते. तिथून तुमची हेअरलाईन मागे जायला लागते. तिथून केस हळहळू नाहीसे व्हायला लागतात आणि तेव्हा तुम्ही समजू शकता की केसगळतीला सुरुवात होतेय. काही पुरुषांमध्ये पुढचेच नाही तर टाळूच्या मागचा भाग असतो त्या भागात केसगळती सुरु होते.
डर्मारोलर उपचारपद्धती
या उपचारपद्धतीत एक रोलर असतो आणि त्याला बऱयाच सुया असतात. ते रुग्णाला ऍनेस्थेशिया देऊन त्यांच्या डोक्याच्या त्वचेवर फिरवले जाते. त्याची यंत्रणा सारखी आहे. या उपचारामुळेही नवीन केस यायला मदत होते. डर्मारोलर उपचारपद्धती ही पीआरपी ट्रीटमेण्टपेक्षा तुलनेने कमी खर्चिक आहे.
हे लक्षात ठेवा…
> पुरेशी झोप घेणे आवश्यक आहे.
> नियमित किमान अर्धा तास व्यायाम.
> योग्य आणि पौष्टीक आहार घ्या.
> ताणतणावामुळेही केसगळती होते.
> आठवडय़ातून दोन ते तीनदा केस धुवायला हवेत.
या गोष्टी टाळा…
> पिझ्झा, बर्गर जंक फूड.
> मैद्याचे पदार्थ.
> अति तेलकट, मसालेदार पदार्थ.
> अति गोड पदार्थ.
खोबरेल तेल गुणकारी
> खोबरेल तेल आठवडय़ातून दोन-तीनदा केसांच्या मुळाशी लावले तरी पुरेसे आहे. त्याने केसांना पोषण मिळते.
> बाजारात मिळणाऱया उत्पादनांमध्ये रासायनिक घटक असतात. ती उत्पादने केसांवर प्रयोग करु नका.
> नारळ, बदाम किंवा ऑलिव्ह ऑईल लावा. पण त्यात कुठल्याही प्रकारचे रासायनिक घटक नकोत.
> उगाच महागडय़ा गोष्टीकडे आकर्षित होऊन ते वापरुन प्रयोग करुन पाहू नका.
> जाहिरातबाजीला भुलू नका. खोबरेल तेलावर विश्वास ठेवा.
केश प्रत्यारोपण
पुरुषांमधील काही हार्मोन्स टक्कल पडायला कारणीभूत असतात. वयानुसार टक्कल पडतं ते हार्मोन्समुळे. ठरावीक वयात केसगळती सुरु होते. पुरुषांमध्ये हे प्रमाण जास्त दिसून येते. केस प्रत्यारोपण ही उपचारपद्धती प्रत्येक केसगळतीसाठी उपयुक्त आहे असे नाही. केसगळतीच्या ग्रेड असतात. ज्यांची सहावी, सातवी ग्रेड असते, त्याच्यामध्ये डोक्याच्या त्वचेवरील 50 ते 60 टक्के केसगळती असते. अशा प्रकरणांत हेअर ट्रान्सप्लान्ट करता येते. पण ते एखाद्या तज्ञ डॉक्टरकडूनच करुन घ्यावे.
असा असावा आहार…
> प्रथिने, जीवनसत्व आणि खनिजयुक्त.
> दोन अंडी, मोड आलेली कडधान्ये किंवा रोजच्या जेवणात थोडसं दही, ताक घेऊ शकाल.
> हिरव्या पालेभाज्या, ऋतुमानानुसार रोज एक फळ.
> जेवणात दररोज डाळींचा समावेश असला पाहिजे.
> मांसाहार असतील त्यांनी मासे, चिकन खावेत. उकडलेले किंवा शॅलो फ्राय केलेला मांसाहारही केसांसाठी चांगला असतो.





























































