
सामना प्रतिनिधी । मुंबई
मुंबईत विविध कामांसाठी ठिकठिकाणी रस्त्यांवर चर खोदून वाहतुकीचे तीनतेरा करणाऱ्या कंत्राटदारांना पालिका चांगलाच दणका देणार आहे. कंत्राटदार नियमानुसार काम करीत आहेत की नाहीत याचा अहवाल एका महिन्यात सादर करा आणि नियम मोडणाऱ्या कंत्राटदारांना काळ्या यादीत टाका, असे निर्देश पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी आज सातही परिमंडळांच्या उपायुक्तांना दिले.
दूरध्वनी, विद्युत सुविधा, पाइपलाइन गॅस यासारख्या सुमारे 20 कामांसाठी कंत्राटदारांकडून रस्त्यांवर आवश्यकतेनुसार चर खोदले जातात. यामध्ये एकाच रस्त्यावर वारंवार चर खोदल्याने चालणेही मुष्कील होते. चर खोदण्याच्या व भरण्याच्या कामांमध्ये सुसूत्रता यावी व कामांची गुणवत्ता चांगली व्हावी यासाठी पालिका आयुक्त वारंवार आदेश देतात, मात्र आयुक्तांनी दिलेल्या आदेशांना केराची टोपली दाखवली जाते. ‘बॅरिकेडस्’ही नीट लावले जात नसल्यामुळे अपघात होण्याचा धोकाही वाढतो. ही बाब निदर्शनास आल्याने परिमंडळीय आयुक्तांनी याची पाहणी करून खात्री करावी व नियम मोडणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करावी, असे निर्देश आयुक्तांनी दिले.



























































