मोबाईल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> शिरीष कणेकर

माझ्या एका मित्राचा मला फोन आला.

‘‘बोल.’’ मी नेहमीप्रमाणे म्हणालो.

‘‘अरे, आत्ता सिंह माझ्या समोर दहा फुटांवर आहे.’’

‘‘सिंह तुझ्या समोर दहा फुटांवर आहे? तू काय राणीच्या बागेत गेलायस की काय?’’

‘‘नाही रे बाबा,’’ तो म्हणाला, ‘‘मी या क्षणी केनयात आहे. नैरोबीला.’’

यावर मी काय बोलणार? जरा सिंहाला फोन दे, मी कन्फर्म करतो असंही मी म्हणू शकत नव्हतो. माझा मित्र सिंहाच्या पोटात गेला असता व ही खबर सिंहानेच फोनवरून डरकाळी फोडून मला दिली असती. या शिंच्या मोबाईलने अक्षरशः क्रांती केल्येय. कोणी कोणाशीही कधीही काहीही बोलू शकतो. माणसं मनानं भलेही लांब गेली असतील, पण देहानं खूपच जवळ आलीत. फक्त दोघांच्या हातात चपटा मोबाईल हवा. तो असतोच. मोबाईलचं अमर्याद साम्राज्य चालू आहे. पूर्वी असं साम्राज्य लग्नाच्या बायकांचं होतं. त्याही पूर्णपणे मोबाईलच्या आहारी गेल्यात. किंबहुना त्यांना त्यांच्या ढालगज आईशी तासन्तास बोलता यावं यासाठीच मोबाईलचा शोध लागलाय याची त्यांना खात्री आहे. बापलेकांचा मोबाईलवर संवाद झालाच (म्हणजे होऊ दिल्यास) तो या धर्तीवर असतो. –

बाप – कसा आहेस रे बाबा?
मुलगा – बरा आहे. बरा आहे. तुम्ही कसे आहात, बाबा?
बाप – चाललंय, चाललंय. येऊन जा रे एकदा भेटायला.
मुलगा – नक्की. नक्की. रविवारी येतो. काळजी घ्या.

याला संभाषण म्हणतात हेच आईला व लेकीला माहीत नसतं. किमान तीन तास चालतं त्याला संभाषण म्हणायचं. ठेवताना आईनं म्हणायचं असतं – ‘‘तुझ्या मागे नेहमी वाघ लागलेला. किती कामं करशील? तुझी ती मरतमढी सासू काहीच करत नाही वाटतं? आपण रात्री सवडीनं बोलू या.’’ संभाषणात बापाचा ओझरता उल्लेखही आला नाही हे दोघींच्याही खिजगणतीत नसतं.

रात्रीही तो मोलाच्या संभाषणाच्या बाहेरच राहणार असतो. शेजारणीची नवऱयाशी होणारी भांडणे, मोलकरणींचे मनस्ताप, रत्ना मावशीची पार बिघडलेली पुरणपोळी, मोदींचं अपयश, भातात पाणी का राहिलं, बाथरूममधला नळ चालू राहिल्याने हे।़।़ घरभर झालेलं पाणी, किडकी भाजी, उतरलेले बोंबील, महाकटकटय़ा, बोहारणी, फलाणी इकडे गेली आणि तिकडे गेली, आमचं नशीबच फुटकं, लोकांच्या सुना मर मर मरतात, आमच्याकडे सगळाच उज्जेड… या व तत्सम टॉपिक्सवर चार ओळी बोलायच्या म्हटल्या तरी तीन तास आरामात निघून जातात. शिवाय रात्री आठवणीनं मोबाईलवरून पाककृतींबाबत खास टिप्स अमेरिकेतल्या मुलीला द्यायच्या असतात – ‘‘कांदा बारीक कापून घे नाहीतर तोंडात येतो.’’ पेपराआड तोंड लपवून बसलेला बाप मनाशी म्हणतो, ‘‘मग तुझा कांदा का तोंडात येतो?’’

दहा मोबाईलवरून दहा साळकाया माळकाया एकाचवेळी एकमेकींशी चकाटय़ा मारतायत असा मोबाईल बाजारात येण्याची बेताबीनं वाट पाहत बाया आहे त्या मोबाईलवर भागवतायत. त्यांच्या सोशिकपणाचा आणखी काय पुरावा हवा? मोबाईलमुळे त्या ‘इम्मोबाईल’ राहू शकतात. खुर्चीत गुळाच्या ढेपेसारखं बसायचं व मुर्च्छा येईपर्यंत फोन फिरवीत बसायचं. कोणाकडे जाणं नको येणं नको. किती मज्जा! तो नवरा मध्ये कडमडतो; गेला उडत. त्याला कशाला किंमत द्यायची? घरातला कचरा तसा तो…

अलीकडे मोबाईलमध्ये व्हिडीओ कॅमेराही असतो. त्यामुळे आपण नक्की कुठं आहोत हे बेमालूमपणे लपवणे अवघड होऊन बसलं. व्हिडीओ कॅमेऱ्याच्या अभद्र आगमनापूर्वीचा हा एक विनोद वाचा, बायको बाहेर जाताना नवऱयाला खडसावून जाते – ‘‘मी परत येईपर्यंत घरीच रहा. कुठं जाऊ नका. मी अधूनमधून फोन करून चेक करीन.’’

त्यानुसार नवऱ्याच्या मोबाईलवर दोनचार वेळा फोन करून तिनं चेक केलं आणि सांगितलं, ‘मिक्सर सुरू करून आवाज ऐकवा.’

त्यानं ऐकवला. तो घरीच असल्याची तिची खात्री पटली.

एक दिवशी फोन न करता अकस्मात ती ऑफिसातून घरी आली. नवरा नाही. गायब. तिनं मुलाला विचारलं, ‘‘बाबा कुठं आहेत?’’

‘‘बाहेर गेलेत.’’ मुलगा म्हणाला, ‘‘रोजच जातात. का कळत नाही, पण ते मिक्सर बरोबर घेऊन जातात.’’

आता ती बाई घरात सीसीटीव्ही लावून घ्यायचा विचार करत्येय. तिचा नवरा सी.सी. कॅमेऱयावर कशी मात करता येईल विचार करतोय.

तशा मोबाईलवरून येणाऱया काही काही सूचना खूपच उपयुक्त आणि व्यवहार्य असतात. उदाहरणार्थ, नवरा ट्रफिकमध्ये अडकलाय. त्याला मोबाईलवरून ‘मेसेज’ येतो – ‘‘सावकाश चालवा. घाई करू नका. घरी तीच बायको असणार आहे जी तुम्ही सकाळी पाहिली होतीत.’’

मला अलीकडे अनामिकांकडून संदेश येतायत. त्यात लिहिलेलं असतं – ‘‘हा स्टिकर तुम्ही उघडू शकत नाही कारण तुमचा मोबाईल स्वस्तातला आहे.’’ ‘मेसेज’ वाचून मी चपापतो. माझा फोन स्वस्तातला आहे हे याला कसं कळलं? आणखी कोणाकोणाला कळलं असेल? आयोजकांकडून पहिल्या वर्गाचा प्रवास खर्च घेऊन मी दुसऱया वर्गात जातो हेही लोकांना कळलं असेल का..?