विना‘आधार’, कर्मचाऱ्यांचा पगार निराधार, बेस्ट प्रशासनाचा तुघलकी निर्णय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
best-2
प्रातिनिधिक फोटो

सामना प्रतिनिधी । मुंबई

आधारकार्ड दिल्याशिवाय नोव्हेंबर महिन्याचा पगार देता येणार नाही असा तुघलकी निर्णय बेस्ट प्रशासनाने घेतला आहे. ‘आधार’ची सक्ती करता येणार नाही असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिलेला असताना बेस्ट प्रशासनाने मात्र कर्मचाऱ्यांसाठी हे परिपत्रक काढले आहे.

आधारचा वापर केवळ सरकारच्या कल्याणकारी योजनांसाठीच करता येऊ शकेल. ‘आधार’ची सक्ती करणाऱया कंपनी, संस्थेला एक कोटी रुपयांचा दंड आणि ‘आधार’ मागणाऱ्या संबंधित कर्मचाऱ्याला 3 ते 10 वर्षांपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा असा निर्णय नुकताच सर्वोच्च न्यायालयाने दिला, मात्र हा निर्णय बेस्ट प्रशासनाच्या गावीही नाही. बेस्ट कर्मचाऱ्यांचा नोव्हेंबर महिन्याचा पगार 15 डिसेंबरला झाला, मात्र ज्यांनी अद्याप आधारकार्डचे तपशील दिलेले नाहीत त्यांना पगार देता येणार नाही असे 14 डिसेंबरच्या या परिपत्रकात म्हटले आहे. आधारकार्डाचा तपशील दिल्यानंतरच त्यांना वेतन प्रदान केले जाईल असे यात म्हटले आहे.

पगारात मिळणार 10 रुपयांची नाणी
प्रवाशांनी दिलेली 10 रुपयांची नाणी हा बेस्टसाठी मोठा डोकेदुखीचा विषय झाला आहे. ही नाणी बँक घेत नसल्यामुळे लाखोंच्या नाण्यांचा डेड स्टॉक बेस्टकडे आहे. तो कमी करण्यासाठी बेस्टने आता परत एकदा कर्मचाऱयांना पगारात 400 रुपये 10 रुपयांच्या नाण्याच्या स्वरूपात देण्याचे ठरवले आहे. एकीकडे बेस्ट कर्मचाऱयांचे वेतन थेट बँक खात्यात जमा होत असले तरी 400 रुपये असे वेगळे दिले जाणार आहेत.

ओंजळीत घ्या नाणी
– कर्मचाऱ्यांना पगारातील 10 रुपयांची 40 नाणी अक्षरशः ओंजळीत किंवा कागदात घ्यावी लागत आहेत. विभागाच्या अधिकाऱ्यांना 1000 नाणी दिली जाणार असून त्यांनी कर्मचाऱ्यांना मोजून ही नाणी द्यायची आहेत.

– नोव्हेंबरमध्ये सुमारे 39 हजार कर्मचारी आणि अधिकाऱयांना पगाराचा एक भाग म्हणून प्रत्येकी 10 रुपयांची 40 नाणी (400 रुपये) देण्यात आली. अशाप्रकारे पगाराचा हिस्सा म्हणून एक कोटी चार लाख रुपयांचे वाटप नाण्यांच्या स्वरूपात झाले.

– बेस्टकडे 3,337 बस असून दरमहा सुमारे 70 लाख रुपये मूल्याची 10 रुपयांची नाणी जमा होतात. बेस्टमध्ये जवळपास 10 हजार कंडक्टर असून त्यांना डय़ुटीवर जाण्यापूर्वी प्रशासनातर्फे प्रत्येकी 100 रुपयांची नाणी दिली जातात. त्यामध्ये 1 रुपया, 2 रुपये, 5 रुपये आणि 10 रुपयांच्या नाण्यांचा समावेश असतो.