
सामना ऑनलाईन। बंगळुरू
बंगळुरू येथे एका अठरा वर्षीय तरुणीची अब्रू ‘पेपर स्प्रे’ मुळे वाचल्याची घटना बुधवारी घडली आहे. तरुणीचे अपहरण करून तिच्यावर कारमध्ये बलात्कार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या मित्राने तिला बेशुद्ध करण्यासाठी तिच्या चेहऱ्यावर पेपर स्प्रे फवारला. पण त्यातील रसायनाचा त्यालाच त्रास झाला. त्याच संधीचा फायदा घेत तरुणीने नराधमाच्या तावडीतून स्वत:ची सुटका करून घेतली.
पीडित तरुणी बंगळुरू येथील एका खासगी महाविद्यालयात शिकते. बुधवारी लेक्चर संपल्यावर ती बसमधून घरी जाण्यासाठी निघाली होती. दसराहल्ली या बसस्टॉपवर उतरल्यानंतर ती घराकडे पायी जात असताना अचानक एक सफेद कार तिच्या बाजूला येऊन उभी राहिली व काही कळायच्या आतच त्यातील एकाने तिच्या चेहऱ्यावर रुमाल टाकत तिला कारमध्ये खेचले. त्या कारमध्ये चालकाबरोबर तीन तरुणही होते. त्यानंतर चालकाने कार सुसाट पळवली. या घटनेने भयभीत झालेल्या तरुणीने त्या तरुणांकडे तिला सोडून देण्याची विनंती केली. पण त्यातील कोणीही तिच्याशी बोलले नाही. त्यानंतर तुमाकुरु रस्त्याच्या कडेला त्यांनी कार थांबवली. त्याचवेळी कारच्या बाजूला एक लाल रंगाची स्विफ्ट कार येऊन थांबली. त्यातून बाहेर आलेल्या तरुणाला बघून तरुणीला हायसे वाटले कारण तो तिचा मित्र सचिन होता. पण दुसऱ्याच क्षणी तिचा भ्रमनिरास झाला. कारण सचिनने तिला सांगितले की तिचे हे अपहरणनाट्य त्यानेच घडवून आणले आहे. त्यानंतर सचिनने तिला सफेद कारमधून उतरवले व आपल्या लाल कारमध्ये जबरदस्तीने बसवले.
नंतर त्याने तिच्याशी अंगलट करण्याचा प्रयत्न केला. तिने त्यास विरोध करताच तुझ्यावर प्रेम असल्याचे सांगत सचिन तिच्यावर बळजबरी करू लागला. यास तरुणीने नकार देताच त्याने तिला बेशुद्ध करण्यासाठी तिच्या चेहऱ्यावर पेपर स्प्रे फवारला. पण त्यातील रसायनामुळे त्याला व तरुणीला गुदमरू लागले. डोळ्यांची जळजळ व्हायला लागली. यामुळे सचिनने कारचा दरवाजा उघडला. त्याच संधीचा फायदा घेत तरुणीने कारमधून बाहेर उडी मारली व ती कशीबशी मुख्य रस्त्यावर पोहोचली. तिथे उभ्या असलेल्या एका रिक्षाचालकाचे तिच्याकडे लक्ष गेले व तो तिच्या मदतीसाठी पुढे धावला. तरुणीने त्याच्याच मोबाईलवरून घरातल्यांशी संपर्क शाधला. त्यानंतर तरुणीच्या आई व भावाने तिला घरी आणले. घरी आल्यावर तिने घडलेल्या प्रसंगाबद्दल कुटुंबीयांना सांगितले. त्यानंतर घरातल्यांनी पोलिसात सचिन विरोधात तक्रार केली. दरम्यान सचिन फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. पेपर स्प्रेमुळेच आपण वाचल्याचे तरुणीने म्हटले आहे.

























































