
सामना प्रतिनिधी । नांदेड
निघालो घेऊन दत्ताची पालखी, स्वामी समर्था भजनात या हो, देवाचा देव बाई लंगडा अशा एकापेक्षा एक सरस रचना सादर करुन ख्यातकिर्त गायक पं. अजित कडकडे यांनी नांदेडकरांना भक्तीरसात चिंब केले.
शगुन सिटी आणि गंगाप्रसाद तोष्णीवाल, रमेश पारसेवार, प्रदीप चाडावार आणि प्रख्यात निवेदक अॅड.गजानन पिंपरखेडे यांच्या पुढाकारातून काल रात्री दत्त जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त महाराष्ट्राचे ख्यातकिर्त गायक पं.अजितकुमार कडकडे यांचे गायन कुसूम सभागृहात आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन विशेष पोलीस महानिरीक्षक फत्तेसिंह पाटील, जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, लेखाधिकारी नीळकंठ पाचंगे, सामनाचे जिल्हा प्रतिनिधी विजय जोशी व बापू दासरी यांची यावेळी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती होती.
दिपप्रज्वलन झाल्यानंतर पं.अजितकुमार कडकडे यांच्या मैफिलीला सुरुवात झाली. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया या नव्या रचनेने कडकडे यांनी सुरुवात केली. त्यानंतर नरसोबाच्या वाडीला जाऊ या चला, गुरु चरणी धन्य होऊ या हे नरसोबाच्या वाडीची महिमा गाणारे गीत सादर केले. गेल्या ३२ वर्षापासून गात असलेल्या निघालो घेऊन दत्ताची पालखी, आम्ही भाग्यवान आनंद निधान, झुलते हळूच दत्ताची पालखी हे गीत दिगंबरा, दिगंबराच्या गजरात सादर करुन रसिकांना दत्त महिमेची अनोखी अनुभूती दिली. अजित कडकडे म्हणाले की, मी आजपर्यंत ही पालखी दोन हजार वेळा गायिली. तरीही या गिताची गोडी आवीटच आहे. प्रत्येक कार्यक्रमात या गीताची मागणी रसिक, प्रेक्षकांकडून होते.
यानंतर स्वामी समर्था या हो, तुम्ही भजनात या हो हे श्री स्वामी समर्थांचे भक्तीगित सादर करुन प्रेक्षकांच्या टाळ्या मिळविल्या. देवाचा देव बाई ठकडा, देव एका पायाने लंगडा हे गीत वेगवेगळ्या अलापी व तानांसह सादर करुन रसिक, प्रेक्षकांना सुखद धक्का दिला. याच मैफिलीत मज फुल ही रुतावे, हा दैव योग आहे, काटा रुते कुणाला हे नाट्यगीत सादर करुन रसिकांना मंत्रमुग्ध केले. सरते शेवटी सजल नयन नित धार बरसती व कैवल्याच्या चांदण्याला ही भैरवी सादर करुन त्यांनी कार्यक्रमाचा समारोप केला. प्रख्यात हार्मोनियम वादक प्रकाश वगळ यांची सुरेख साथ, रुपक वझे यांचे उत्कृष्ट तबला वादन, दिनकर भगत यांनी पखवाजवर दिलेली साथ तसेच उल्हास दळवी यांची रिंधमची साथ व सहगायक किशोरभाई देसाई यांची संगत यामुळे हा कार्यक्रम आणखीनच बहारदार होत गेला. संयोजन समितीचे अॅड.गजानन पिंपरखेडे यांनी यावेळी वेगवेगळे प्रश्न विचारुन पं.अजित कडकडे यांना बोलते केले. गुलाबी थंडीत देखील रसिकांनी या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात हजेरी लावली होती.





























































