
सामना प्रतिनिधी । कोपरगाव
गेली पाच दशके निळवंडेच्या माध्यमातून आपली राजकीय पोळी भाजूनही समाधान न पावलेले आजही स्थानिक शेतकऱ्यांची दिशाभूल करून कालव्याच्या कामांना अडथळे निर्माण करण्याचे काम करीत आहेत. त्यांना आता एकच सांगतो निळवंडेचे राजकारण बंद करा, कालव्याला आडवे येऊ नका अन्यथा आडवे केल्याशिवाय रहाणार नाही आणि शिवसेना ते खपवूनही घेणार नाही. प्रसंगी रस्त्यावर उतरून सडेतोड उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा नगर उत्तर जिल्हा प्रमुख प्रमोद लबडे यांनी दिला आहे. निळवंडे धरणाचे काम त्वरीत सुरू करावे याकरीता येत्या 31 डिसेंबरला कोपरगाव तहसीलवर शिवसेना इशारा मोर्चा नेणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
प्रसिद्ध पत्रकात 14 जुलै 1970 म्हणजे तब्बल 49 वर्षांपूर्वी शासनाने मंजूर केलेल्या 182 गावांचे लाभक्षेत्र असलेल्या निळवंडे धरणांचे काम कधीच पूर्ण होऊ दिले नाही. कालव्यांच्या कामांसाठी अनेक निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन अनेक उदघाटन झाली. पण कामाचा मुहूर्त कधी लागू दिला नाही. आज निधीही आहे सर्व मंजुऱ्याही झाल्या आहेत. कामाचे लेखी आदेशही मिळाले आहेत मात्र कामासाठी पोलीस संरक्षण घेण्याची वेळ येते ही दुर्दैवी बाब आहे. अकोले तालुक्यातील भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण झाल्याचे पत्रही आमदार पिचड यांना दिले आहे. तरीसुद्धा राजकीय असूयेपोटी शासकीय कामात अडथळे निर्माण करण्याचे काम केले जात आहेत. केवळ राजकीय हेतूने कोणी जर लाखो शेतकऱ्यांच्या भविष्याचा जिव्हाळ्याच्या प्रश्नाशी खेळणार असेल तर शिवसेना कदापि ते सहन करणार नाही. त्या शेतकऱ्यांच्या मागे शिवसेना खंबीरपणे उभी राहील. यासंदर्भात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना भेटून कल्पना देणार असल्याचेही पत्रकात म्हटले आहे.
निळवंडे असो गोदावरी असो या दोन्ही कालव्यांचा प्रश्न राजकारणामुळेच रखडला गेला. भूतकाळात काय झाले त्यापेक्षा आता शेतकऱ्यांच्या तोंडात आलेला घास कोणी हिसकावत असेल तर सर्व शेतकऱ्यांसह शिवसेना रस्त्यावर उतरणार असून तसे निवेदन कोपरगाव तहसील कार्यालय येथे ३१ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता मोर्चाने जाऊन तहसीलदार व संबंधित अधिकारी यांना देणार असल्याचे प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.































































