130 रुपयांत 100 चॅनेल्स, ट्रायचा नवीन टॅरिफ प्लान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

जेवढे चॅनेल पाहायचे असतील तेवढय़ाचेच पैसे मोजा. टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथोरिटी ऑफ इंडिया अर्थात ‘ट्राय’ने ग्राहकांसाठी हा नवीन टॅरिफ प्लान लागू केला आहे. येत्या 29 डिसेंबरपासून सर्वच मल्टी सर्व्हिस ऑपरेटर्स (एमएसओएस) आणि लोकल केबल ऑपरेटर्सनी (एलसीओएस) ही सिस्टम लागू करावी, असे आदेशही ‘ट्राय’ने दिले आहेत. त्यामुळे यापुढे प्रेक्षकांना फक्त 130 रुपयांत तब्बल 100 चॅनेल्स पाहायची पर्वणी मिळणार आहे.

काही वर्षांपूर्वी जेव्हा डायरेक्ट टू होम (डीटीएच) सेवा सुरू करण्यात आली तेव्हा जास्तीत जास्त ग्राहकांनी या सेवेचा लाभ घ्यावा यासाठी ‘ट्राय’ने मोठय़ा प्रमाणात जनजागृती केली होती. त्याला प्रेक्षकांकडून प्रचंड प्रतिसादही मिळाला; परंतु एण्टरटेनमेंट, किड्स, नॉलेज, स्पोर्ट्ससारख्या महागडय़ा चॅनेल्सचे पॅक्स निवडण्याच्या मोहापायी ग्राहकांना डीटीएच ही सेवा महाग पडत गेली. परंतु नव्या सिस्टममुळे प्रेक्षकांना टीव्ही चॅनेल्सची निवड करण्याचे स्वातंत्र्य मिळणार असल्याने तसेच त्या त्या चॅनेल्सचेच पैसे भरावे लागणार असल्याने अवघ्या 130 रुपयांत 100 चॅनेल्स पाहता येणार आहेत.

यासंदर्भात ‘ट्राय’कडून उपयुक्त अशी माहितीही जाहीर करण्यात आली आहे. नव्या सिस्टममुळे ग्राहकांवर टीव्ही चॅनेल्सची सक्ती करण्यात येणार नाही, तर प्रेक्षकांना जे जे चॅनेल्स पाहायचे आहेत त्याचेच पैसे द्यावे लागतील. विशेष म्हणजे, इलेक्ट्रॉनिक्स प्रोग्राम गाइड (ईपीजी)च्या सहाय्याने टीव्ही क्रीनवर प्रत्येक चॅनेलची एमआरपी दर्शविण्यात येणार आहे, जेणेकरून कोणताही डिस्ट्रिब्युटर ब्रॉडकास्ट ट्रायने ठरवून दिलेल्या दरापेक्षा जास्त दर आकारू शकत नाही.

दर महिन्याचा खर्च
नेटवर्क कॅपेसिटी फीच्या रूपात ग्राहकांना 100 चॅनेल्ससाठी दरमहा 130 रुपये द्यावे लागतील. जर का तुम्हाला 100 पेक्षा अधिक चॅनेल्स हवे असतील तर पुढच्या प्रत्येक 25 चॅनेल्ससाठी 20 रुपये जादा मोजावे लागतील. याव्यतिरिक्त ग्राहकाने जर ‘पे’ चॅनेल्सची निवड केली तर या चॅनेल्सचे आधीपासूनचे ठरलेले दर यात समाविष्ट होतील. ट्रायकडून चॅनेल्सची प्राइज रेंज एक रुपयापासून 19 रुपयांदरम्यान असणार आहे.

मोफत चॅनेल्सही मिळणार
सर्वच सर्व्हिस ऑपरेटर्सनी ग्राहकांना फ्री टू एअर (एफटीए) चॅनेल्स पूर्णपणे मोफत दाखवावेत असे ट्रायचे स्पष्ट आदेश आहेत. असे असले तरी सर्वच एफटीए चॅनेल दाखविणे सर्व्हिस ऑपरेटर्सना सक्तीचे नाही. ग्राहक या चॅनेल्सची स्वतःच निवड करू शकतात. मात्र दूरदर्शनचे सर्वच चॅनेल्स दाखविणे बंधनकारक आहे.

केबल ऑपरेटर्सची आज बैठक
महाराष्ट्र केबल ऑपरेटर संघटनांची महत्त्वाची बैठक 26 डिसेंबर रोजी सकाळी 11.30 वाजता वांद्रे (प.) येथील रंगशारदा सभागृहात आयोजित केली आहे. शिवसेनेचे आमदार अॅड. अनिल परब यावेळी केबल ऑपरेटर्सना मार्गदर्शन करतील.