हिंदुस्थान-ओमान आमनेसामने, एएफसी आशियाई स्पर्धेआधी शेवटची सराव लढत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । अबुधाबी

फिफा रँकिंगमध्ये 97 व्या स्थानावर असलेल्या हिंदुस्थानी संघासमोर उद्या 82 व्या रँकिंगवरील ओमानचे आव्हान असणार आहे. 5 जानेवारीपासून सुरू होणाऱया एएफसी आशियाई फुटबॉल स्पर्धेच्या आधी हिंदुस्थानी संघाची ही शेवटची सराव लढत असणार आहे. मात्र या लढतीबाबत दोन्ही संघांनी गोपनीयता बाळगली आहे. दोन्ही संघांच्या व्यूहरचना गुलदस्त्यातच ठेवण्यात आल्या आहेत.

खडतर आव्हान
याआधी जॉर्डन, चीनसारख्या बलाढय़ देशांविरुद्ध हिंदुस्थानचा संघ खेळलाय. ओमानही त्याच तोडीचा संघ आहे. आगामी एएफसी स्पर्धेत आम्हाला आशियाईतील दादा संघांचा सामना करावा लागणार आहे. ओमानविरुद्धच्या लढतीमुळे आम्हाला खडतर आव्हानासाठी सज्ज राहता येणार आहे, असे स्पष्ट मत हिंदुस्थानी संघाचे मुख्य प्रशिक्षक स्टीफन कॉन्स्टेण्टाईन यांनी या वेळी व्यक्त केले.

किटविना संघ
आगामी एएफसी आशियाई चषक फुटबॉल स्पर्धेच्या तयारीसाठी हिंदुस्थानी संघाचा आंतरराष्ट्रीय मैत्रिपूर्ण सामना गुरुवारी होणार आहे. पण सुनील छेत्रीच्या नेतृत्वाखालील हिंदुस्थानी फुटबॉल संघाला अद्याप अधिकृत क्रीडा साहित्याची प्रतीक्षा लागून राहिली आहे. सराव सामन्यासाठीचे कपडे आणि राष्ट्रीय संघाची जर्सी असे सर्व कपडे अद्यापही न मिळाल्याने हिंदुस्थानी फुटबॉल संघाच्या अडचणीत वाढ झाली आहे.

एएफसी आशियाई स्पर्धेतील लढती खालीलप्रमाणे
हिंदुस्थान – थायलंड – 6 जानेवारी, 2019
हिंदुस्थान – यूएई – 10 जानेवारी, 2019
हिंदुस्थान – बहरीन – 14 जानेवारी, 2019