
अनुराधा राजाध्यक्ष
ज्येष्ठ लेखक राजन खान. मातीच्या घरापासून मुंबईच्या चाळीपर्यंत त्यांच्यासोबत त्यांच्या लेखणीने स्वैर संचार केला आहे. आता जरी ती पुण्याला स्थिरावली असली तरी तिची मातीची… डोंगर उताराची ओढ संपत नाही…
‘मी लिहितो आणि लिखाणाला जात नसते… राजन हिंदूंचं आणि खान मुसलमानांचं असा कुठलाही पुरावा कुठेही नाही. नाव आणि आडनाव ही धर्मांची ठेकेदारी नाही. भाषा माणसानं बनवली. त्यामुळे कुठल्याही जाती-धर्माची मालकी शब्दांवर नाही. धर्म ही कल्पनाच क्षुद्र आहे. आम्हीच श्रेष्ठ असं म्हणणारा प्रत्येक धर्म मानव जातीचा अपमान करतो.’’ असं मानणारे आणि जाती-धर्माच्या पलीकडे माणसांना जोडण्यासाठी जगणारे राजन खान. किती मोकळेपणानं सांगत होते त्यांचा आयुष्य प्रवास…
‘‘जन्म जावळीचा. मूळ गाव तांदुळवाडी. घर पत्र्याच्या छप्पराचं, मातीच्या विटांचं. वडील सरकारी नोकरीत. पण सरकारी नोकर पैसे खातातच या अलिखित नियमाला बट्टय़ा असणारं त्यांचं प्रामाणिक वर्तन. त्यामुळे बदल्या खूप. त्यांच्यामागून बिऱहाड फिरायचं. वडिलांचं वाचन दांडगं. ते कथाही लिहायचे. आजोबा कीर्तनकार. पौराणिक नाटकं बसवायचे. आई गोष्टी सांगायची. माझ्यात गोष्टीवेल्हाळपणा या सगळय़ांमुळे आलाय. पदव्या, शिक्षण, बुद्धिमत्ता आणि सरकारी हुद्दा असूनही व्यवहारशून्य वाटावेत इतके साधे होते वडील. ज्या गावात बदली होऊन जायचो, तिथे त्यांनी जे घर राहण्यासाठी शोधलेलं असायचं ते माणसांनी राहू नये इतकं भयंकर अवस्थेत असायचं. मला आठवतंय, एसटीवर सामान चढवून आई-वडील, भाऊ आणि तान्ही बहीण यांच्यासह 8 व्या वर्षी मी जुन्नरला पोहोचलो तेव्हा रात्रीचे नऊ वाजले होते.
पण जुन्नर मध्यरात्रीसारखं गुडूप झोपलेलं होतं. एसटी गेल्यावर आमचं कुटुंब थंडीत कुडकुडत अनाथासारखं उभं. वडिलांनी कुठून तरी छकडा आणला आणि जुन्नरच्या पार दुसऱया टोकाला ज्या घरात आम्ही गेलो ते होतं एका खोलीचं, मातीचं, उंच छपराचं घर. तिथे होता एकमेक उलटय़ा तबकडीला लटकलेला बल्ब. वडील आणि भावंड झोपून गेली. मी मात्र आईच्या मांडीवर डोकं ठेवून आईसह जागा होतो रात्रभर. सकाळ उगवली ती आई-वडिलांच्या भांडणांनी. ही अशी घरं तुम्हाला मिळतात तरी कुठून? याच्यावरून. मग वडिलांनी शोधलं दुसरं घर. तिथे खेळता-खेळता छत्रपतींची नाणी सापडायची मातीत. सहा वर्षे तिथेच राहिलो. नोकरीच्या निमित्तानं वडिलांचे दौरे, बदल्या डोंगरांमध्ये असणाऱया गावात व्हायच्या. तीन-तीन महिने घराकडे फिरकायचे नाहीत ते. पण त्याही काळात स्वाभिमानी वृत्तीनं, उसनवारी न करता आम्हाला सांभाळायची आई. तरीही कधी कधी अपरिहार्यपणे उपासही घडलेच तेव्हा. नंतर तीन बहिणी झाल्या मला. आईचं बाळंतपण मीच करायचो. आई खाटेकर पडून असायची. स्वयंपाक, तिला जेवू घालणं, बाळाला पायावर घालून अंघोळ, सुंठकडा, डिंकवडा, कपडे-भांडी, बाळाचं हगणं-मुतणं… थोरला म्हणून आणि मुलगी म्हणूनही मीच केलं ते. मुलगी अशासाठी म्हणतो मी स्वत:ला, कारण या सगळ्या कामासाठी बाईचा हात असावा लागतोच, तो माझा होता.’
राजनदादा म्हणालेही लगेच, ‘माझ्यात एक स्त्री आहे आणि बाळंत होत असलेल्या आईत स्त्रीबरोबरच खमकेपणानं वागणारा पुरुषही आहे हे मला तेव्हाच कळलं.’ त्यांच्या मते लिंगभेद हा फक्त योनी आणि लिंग एवढाच असतो. माणूस म्हणून सगळे सारखेच. वेल्हे गावात पत्र्याचं छप्पर आणि छोटंसं अंगण असलेल्या घरात राहत असतानाच, ते मामांच्या फ्लॅटमध्ये मुंबईलाही राहिले अनेकदा. पण मुंबईत जीव घुसमटला त्यांचा. कारण त्यांना जाणवलं, तिथं माणसं नाही, गर्दी राहते. गिरगाव ते घाटकोपर या भागात राहिलो. लहानपणी आणि मोठेपणीसुद्धा. जुन्नरला आठ वर्षांचा असताना वडिलांनी बाबुराव अर्नाळकरांचं पुस्तक आणलं होतं. ते वाचलं आणि अफूची नशा जडावी तशी वाचनाची नशा जडली. वाचनालयात वाचलं खूप. आईच्या बाळंतपणात घर सांभाळायचो, त्यामुळे मित्र नाहीत. वडील फिरतीवर, आई खाटेकर, भावंडं लहान. मानसिक एकटेपणाचा आधार होतं वाचन. त्यातूनच बाराक्या-तेराव्या वर्षी लिहायला लागलो. लेखक व्हायचं होतं म्हणून नाही, लिहावसं वाटायला लागलं म्हणून. आजही मी लेखक आहे असं वाटतच नाही मला. खरं तर श्वासाइतकं गरजेचं वाटतं लिहिणं म्हणून मी लिहितो. सोळाव्या वर्षी वडिलांशी वाद झाला. तुकोबा श्रेष्ठ की ज्ञानेश्वर यावरून. मी म्हणालो, ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली, तेव्हा भगवग्द्गीता होती. तुकोबांचं लिखाण जगण्यातून आलंय त्यामुळे ते श्रेष्ठ. वडिलांनी वाईट शिवी दिली. ‘आमचं खाऊन आम्हालाच बोलतो’ असंही म्हणाले. मग दुसऱयाच दिवशी रंगाऱयाकडे नोकरीला लागलो. शिक्षण, रंगाची कामं, मित्राच्या शेतात कामं, लिखाण सगळंच सुरू झालं. कुणी मूळ गाव विचारलं तर मी सांगतो, ‘पृथ्वी’. पण खोदून खोदून विचारलं तर सांगतो, ओतूर. तिथे प्रेमात पडलो, पेंटिंगचा धंदा केला, शेती केली. भावभावनांची जडणघडण तिथेच घडली. चैतन्य माऊलींचं ते गाव. ‘राम कृष्ण हरी’ हा मंत्र तुकारामांनी त्या गावात तयार केला असं म्हटलं जातं. तिथे प्रवचन कीर्तनही ऐकलं आणि तमाशेही पाहिले. वारी आणि बारी दोन्ही झालं तिथे. ‘अक्षर मानक’चा जन्मही ओतूरचाच. ‘अक्षर मानक’ हा शब्द गोरेगावात अण्णाभाऊ साठेंच्या दारात, रात्री दीड वाजता सुचला. मी ज्ञानी नाही. ज्ञानाचा संग्राहक आहे. दादर-मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या कट्टय़ावर बसायचो. जेव्हा वाटलं मुंबईचा गोडवा माणसांच्या बुजबुजाटात हरकलाय, तेव्हा फक्त लिहायचं असं ठरवून बारामतीला आई-वडिलांकडे परतलो. नोकरी सोडलीस आता जगायचं कसं? असं आईनं किचारलं. खानावळीचा रेट साठ रुपये महिना होता तेव्हा. लेखनाचे वर्षाकाठी बाराशे-तेराशे यायचे. महिना शंभरप्रमाणे ते सगळे आईला द्यायचो आणि राहायचो तिथे.’
बारामतीमध्ये नाटक, लेखन, अनेक सांस्कृतिक कार्यक्रम, छात्रभारती, साप्ताहिक चालवणं यातच कल्पनाताई भेटल्या आणि राजनदादांच्या प्रेमात पडल्या. राजनदादा म्हणाले, ‘आई होती जोडीला, पण तिचं सगळं मीच केलं. त्यामुळे तिचं आईपण मला कुठे अनुभवता आलं? ते आईपण इतर स्त्रियांत शोधतो मी. म्हणून बायकोलाही माई म्हणतो मी. माईशी बोलून ठरवलं होतं, दोघांपैकी एकानं नोकरी करायची. मी काम केलं तर दोन वेळचा वडापाव 100 टक्के देईन. तिनं काम केलं तर मी घर सांभाळीन. माझं अक्षर पाहून मेनकेच्या पु. कि. बेहरेंनी मला नोकरी देऊ केली. म्हणून माईनं घर सांभाळलं. 750 रुपये पगार. तेव्हा खूप होते ते. माईला मोठय़ा घरातच ठेवायचं म्हणून कधी कधी 750 पगार आणि भाडं मात्र हजार अशीही घरं निवडली.
राजनदादांच्या मते, घराचं नाव घर असाव. उगाच शाकुंतल वगैरे नको. तसं मुलाचं नाव मुलगाच असाव. कोकणात मुलाला झिल म्हणतात. म्हणून त्यांच्या पहिल्या मुलाचं नाव झिला. देबूचा अर्थ कुठल्याच शब्दकोशात नाही. नावात काय अर्थ आहे या अर्थाला जागणारा हा शब्द. चार्वाकापासून गाडगेबाबांपर्यंत सगळय़ांनाच आपले पूर्वज मानणाऱया राजनदादांना असंही वाटतं की गाडगेबाबा त्यांचे वडील आणि आजोबांचं नाव नातवाला ठेवतात म्हणूनही त्यांच्या दुसऱया मुलाचं नाव देबू. राजनदादा म्हणाले, ‘गाडगेबाबांसारखंच मलाही भंगी काम करायचंय. करतोय. देव, जाती, लिंग, भ्रष्टाचार यांचा कचरा मलाही साफ करायचाय. ‘अक्षर मानक’ची चळकळ हेच सांगते की, पहिल्यांदा कुटुंब सुखात ठेवा. कारण आयुष्यात सगळय़ात जास्त भांडणं घरातच होतात. प्रत्येक घर सुखी झालं की जग सुखी होईलच. अजूनही पुण्यात भाडोत्री घरातच राहतो मी. मरायला मात्र कोकणात जायचंय.’ ‘पुण्याचा पिरपिऱया पाऊस’ या गोष्टीत त्यांनी त्यांच्या स्वप्नातलं घर रेखाटलंय. विकासाच्या नावाखाली काढलेल्या शहरात न राहता मेंदूची शांतता मिळणाऱया डोंगरात साताऱयाला थोडीशी जागा घेतली आहे त्यांनी. वयाच्या पंधराव्या वर्षापासून जगण्याची धावपळ केल्यावर आता आत्मएकांताच्या शोधात आहेत ते. त्या घरात असेल स्वत: रमायला पडवी, भरपूर ग्रंथ आणि मनात आलं तर लिहिण्यासाठी कागद… मरताना मुलं किंवा बायको जवळ असतील की नाही हे माहीत नाही त्यांना, पण पुस्तक मात्र जवळ असावं आणि ते वाचण्यासाठी डोळे शाबूत असावेत हीच त्यांची मनापासूनची इच्छा आहे. त्यांचं स्वप्नातलं घर प्रत्यक्षात यायला अजून वेळ आहे, पण त्यांच्या माणसांना जोडणाऱया मनाच्या गाभाऱयात मला शिरता आलं आणि माझ्या मनातला माणूसपणाचा सहज हुंकार मलाच ऐकू आला.
























































