
सामना प्रतिनिधी । मुंबई
तब्बल तीन वर्षांनंतर मुंबईकरांनी ट्रंकेत जपून ठेवलेली कानटोपी, मफलर, स्वेटर बाहेर काढली आहेत. थंडीमुळे मुंबई चांगलीच हुडहुडली असून आज पारा 12.4 अंश सेल्सियस एवढा घसरला.
मुंबईत तशी थंडी गायबच झाली होती. यंदा मात्र शहर आणि उपनगरातील वातावरण मस्त थंडगार आहे. गेले काही दिवस घामटा कुठे गायबच झाला आहे. अर्थात या उबदार थंडीचे संकेत नोव्हेंबरमध्येच मिळाले होते. नोव्हेंबरमध्ये तापमान 15 अंश सेल्सियसपर्यंत घसरले होते.
आज तर थंडीने कमालच केली. सांताक्रुझ वेधशाळेत तापमानाची नोंद 12.4 अंश सेल्सियस एवढी झाली. किमान तापमानापेक्षा ही नोंद पाच अंश सेल्सियसने कमी होती.




























































