महाबळेश्वरजवळ नाल्यावरील पूल अंत्ययात्रेसह कोसळला; 25 जण जखमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
Bridge Collapses Near Mahabaleshwar

सामना प्रतिनिधी । महाबळेश्वर

महाबळेश्वरपासून सुमारे 30 कि. मी. दुर्गम भागातील खरोशी या गावात ओढय़ावरील 20 वर्षे जुना लोखंडी पूल (साकव) कोसळल्याने 25 जण जखमी झाले आहेत. जखमींवर तळदेव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत. एका वृद्धेची अंत्ययात्रा त्या पुलावरून स्मशानभूमीकडे जातानाच ही दुर्घटना घडली.

विजय कदम, रमेश कदम, लक्ष्मण कदम, रमेश कदम, अशोक कदम, रामचंद्र कदम, भीमराव कदम व राजाराम कदम अशी जखमींची नावे आहेत. रात्री कृष्णाबाई चांगू कदम (95) यांचे निधन झाल्याने मुंबईहून आलेले आणि ग्रामस्थ व नातेवाईक जमले होते. सकाळी अकराच्या दरम्यान स्मशानभूमीकडे जाणाऱया रस्त्यावरील मंदिराच्या मागील ओढय़ावरील लोखंडी पुलावरून अंत्ययात्रा निघाली होती. यावेळी पूल कोसळला आणि 20 ते 25 नातेवाईक मृतदेहासह ओढय़ात कोसळले. यात सर्वजण जखमी झाले. यामधील दोघांची प्रकृती गंभीर आहे.

पुलाबाबत प्रशासनाची दिरंगाई

पूल धोकादायक झाल्याची ग्रामस्थांनी अनेक वेळा माहिती देऊनही प्रशासनाकडून केवळ कागदोपत्री पूर्तता करण्यातच वेळ घालविला जात होता. तसेच सकाळी 11 वाजता घडलेल्या दुर्घटनेबाबत दुपारी उशिरापर्यंत प्रशासनाकडून कोणतीही दखल घेतली गेली नाही. कोणताही अधिकारी किंवा कर्मचारी फिरकला नाही. याबाबत गावकऱयांनी नाराजी व्यक्त केली.