
सामना प्रतिनिधी, मुंबई
एल्फिन्स्टन रोड येथील चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेनंतर रेल्वेचे पादचारी पूल बांधण्यासाठी हिंदुस्थानी लष्कराला पाचारण करण्यात आले होते. परंतु रेल्वेचे अभियंते देखील रेकॉर्डब्रेक वेळेत पादचारी पूल उभारू शकतात हे लोकमान्य टिळक टर्मिनस येथील पादचारी पूल 72 दिवसांत बांधून मध्य रेल्वेने दाखवून दिले होते. आता मस्जिद स्थानकातील एक पादचारी पूल तर मध्य रेल्वेने अवघ्या 33 दिवसांत बांधून नवा विक्रम स्थापन केला आहे.
मस्जिद स्थानकात दक्षिण टोकाकडे जुना पादचारी पूल पाडून त्या जागी नवा 4.88 मीटर रुंदीचा पादचारी पूल रेकॉर्डब्रेक 33 दिवसांत बांधून मध्य रेल्वेने प्रवाशांना नव्या वर्षांची भेट दिली आहे. हा पुलाचा डेक पूर्वी 2.44 मीटर रुंद होता. तो आता 4.88 मीटर इतका रुंद करण्यात आला आहे. पुलाच्या पायऱया पूर्वी 2.44 मीटर इतक्या रुंद होत्या. त्या आता 3.66 मीटर इतक्या रुंद करण्यात आल्या आहेत. या पुलाच्या दुसऱया बाजूकडील पायऱयांची रुंदी 1.80 मीटर इतकी होती. ती 2.30 मीटर इतकी रुंद करण्यात आली आहे. या पुलाची लांबी 17 मीटर इतकी आहे. हा पूल 45 दिवसांत पूर्ण करण्याची घोषणा मध्य रेल्वेने केली होती. परंतु प्रत्यक्षात 33 दिवसांत टार्गेटच्या 12 दिवस आधीच पादचारी पुलाचे काम पूर्ण करण्यात यश आले आहे. हा पूल बांधण्यासाठी 1.25 कोटी रुपये इतका खर्च आला आहे.
सहा तासांचे दोन ब्लॉक घेऊन काम पूर्ण
26 नोव्हेंबर 2018 रोजी जुना पूल प्रवाशांसाठी बंद करण्यात आला. 2 डिसेंबर रोजी रविवारी सहा तासांचा मेगाब्लॉक घेऊन जुन्या पुलाचे बांधकाम हटविले गेले. पुन्हा 16 डिसेंबर रोजी रविवारी सहा तासांचा ब्लॉक घेऊन नवीन गर्डर टाकण्यात आले आणि 17 ते 30 डिसेंबर या काळात पुलाच्या पायऱयांपासून इतर सर्व कामे वेगाने पूर्ण करण्यात आली. आता 1 जानेवारीपासून हा पूल प्रवाशांच्या सेवेत दाखल होत आहे.
























































