
सामना ऑनलाईन, मुंबई
देशातील लोकशाहीबद्दल तरुण पिढीची नेमकी काय मते आहेत हे जाणून घेण्यासाठी दक्षिण- मध्य मुंबईचे खासदार राहुल शेवाळे यांनी ‘डेमोक्रॅसी अॅण्ड मी’ या विषयावर एका स्पर्धेचे आयोजन केले आहे. यातील 25 विजेत्यांना प्रजासत्ताक दिनी राजपथावरील परेड, संसद भवन आणि राष्ट्रपती भवनाला भेट देण्याची संधी मिळणार आहे.
दक्षिण-मध्य मुंबईतील महाविद्यालयांमध्ये येत्या 10 जानेवारीला ही स्पर्धा होणार आहे. 18 ते 25 वर्षे वयोगटासाठी आयोजित केलेल्या या स्पर्धेत 600 ते 1000 शब्दांत स्पर्धकांनी आपली मते मांडायची आहेत. पहिल्या पाच विजेत्यांना आकर्षक बक्षीस आणि सर्व स्पर्धकांना विशेष प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात येणार आहे. मात्र, या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी स्पर्धकाकडे मतदार ओळखपत्र असणे गरजेचे आहे. युवकांना देशप्रेम आणि लोकशाही याबाबत नव्याने जागृत करण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन केले आहे, असे खासदार राहुल शेवाळे यांनी सांगितले.

























































