विशाखा अजय महाडीक खून तपासात हलगर्जी: ८ जानेवारीला कसबावासियांचा निषेध मोर्चा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । संगमेश्वर

कसबा येथील विशाखा अजय महाडीक या महाविद्यालयीन विद्यार्थिनीचा निर्घूण खुन झाला. खुनाचा प्रकार समोर यायच्या आधी २० दिवस ती बेपत्ता असल्याची तक्रार पालकांनी संगमेश्वर पोलीस ठाण्यात दिली होती. या प्रकऱणी संशयीत म्हणून तिच्या वडिलांनी सुनील गुरव (कसबा ) याचे नावही दिले होते. मात्र त्याची केवळ किरकोळ चौकशी करून त्याला सोडून देण्यात आले. वेळो वेळी पोलिसांकडे चौकशी केली असता फारसे गांभिर्याने न घेता उलट तुमची पोरगी पळून गेली असेल असे सांगण्यात आले. जर पोलिसांनी त्याच वेळी सुनील गुरव याला हिसका दाखवला असता तर माझी मुलगी आज जिवंत असती असा आरोप मुलीचे वडील अजय महाडीक यांनी कसबा येथील श्री चंडीका मंदीरात झालेल्या शोकसभेत केला.

विशाखा महाडिक हिची हत्या झाल्याचे कळताच कसबा पंचक्रोशीत संतापाची लाट उसळली. त्यात पोलिसांनी तपासात केलेली दिरंगाई, उदासिनता पाहता पिडीतांना न्याय मिळावा या साठी कसबा वासियातर्फे चंडिका मंदीरात शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी शिवसेना सहसंपर्कप्रमुख राजेंद्र महाडीक, प.स.सदस्य सुजित महाडीक, मुरलीधर बोरसुतकर,कसबा सरपंच अनंत शिगवण, उपसरपंच प्रसाद फाटक आदी ग्रामस्थ हजर होते. त्यात महीलांची उपस्थिती लक्षणीय होती.

संगमेश्वर येथील एका महाविद्यालयात शिकणारी विशाखा महाडीक ही युवती १ डिसेंबर पासून बेपत्ता झाली होती. त्या संबधी मुलीची आई चैत्राली महाडीक हीने संगमेश्वर पोलीस ठाण्यात मिसिंगची तक्रार दिली होती तर मुलीच्या वडिलांनी फणसवणे गुरववाडी येथील सुनिल गुरव याच्यावर संशय व्यक्त केला होता. त्याप्रमाणे संगमेश्वर पोलिसांनी सुनिलकडे चौकशी करुन त्याला सोडून दिले होते.

त्यानंतर सडलेल्या अवस्थेत विशाखाचे प्रेत देवरुख नजिक सापडले होते. देवरुखचे पोलीस निरिक्षक शिवाजी पाटील व सहकारी पोलिसांनी अवघ्या २४ तासात सुनिल गुरव याला जेरबंद केले. त्याने खुनाची कबूली दिली. हाच तपास जर संगमेश्वर पोलिसांनी २० दिवसांत केला असता तर आज माझी मुलगी जिवंत असती असे मुलीच्या वडीलांनी सभेत सांगत हंबरडा फोडला. सभेत संगमेश्वर पोलिसांचा निषेध करण्यात आला.

पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असले तरी सुनिलचा मुलगा महेंद्र व विशाखाचे प्रेम संबध होते व त्याला महेंद्राच्या आईचा व सुनिलचा विरोध होता. त्यामुळेच हा खून झाला असून या मधे महेंद्र व त्याच्या आईचा पण हात असू शकतो म्हणून त्या दोघानांही सहआरोपी करण्यात यावे, अशी मागणी आजच्या सभेत करण्यात आली.

त्याच बरोबर जरी आरोपीने एकट्याने खुन केल्याचे कबुल केले असले तरी ते शक्य नसून नेमका हा खुन कोठे झाला, प्रेत देवरुख जवळ नेवून टाकण्यासाठी ज्या गाडीचा वापर केला, ती गाडी, त्याला सहकार्य करणारा कोणी ना कोणी असेल त्याचा तपास पोलिसांनी करावा, अशी मागणीही करण्यात आली. देवरुख पोलिसांनी तर आमच्या भावनेशी खेळण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप शशिकांत हैबत यांनी केल्याने यावर महीला आक्रमक होत त्यांनी दुजोरा दिला.

याविषयी राजेंद्र महाडीक यांनी माहिती घेतली असता बुधवारी सकाळी दहाच्या सुमारास देवरुख पोलिसांनी कसबा येथे फोन करुन आम्ही आरोपीला घेउन शास्त्रीपूल येथे येत आहोत त्या ठिकाणी आरोपीने विशाखाचे दप्तर वगैरे टाकले आहे ते शोधायचे आहे, तरी तुम्ही ग्रामस्थ व पन्नास येक महीला पुला जवळ या असे सांगितल्याने आम्ही सारे तेथे गेलो व नदीमधे पोलिसांसमवेत शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसानी आम्हाला गोळवली पर्यंत पायी फिरवले. त्याच वेळी गाडीत आरोपीला पाहताच महीलांचा संताप अनावर झाल्याने त्यानी आरोपीवर चाल केली आणि हल्ला करण्याचा प्रयत्न केला. हा संताप उसळून येणे साहजिक होते हे पोलिसांनी समजुन घ्यायला हवे होते. पण तसे न होता पोलिसांनी महीलाना अर्वाच्च भाषा वापरल्याने तेथील वातावरण अधिकच तापले. तेथे मध्यस्थी करण्यास गेलेल्या ग्रामस्थांनाच दमदाटी करुन आत घालण्याची भाषा केल्याने वातावरण अधिकच तापले. हा सारा प्रकार राजेंद्र महाडीक यांनी ऐकताच ते सभेत चांगलेच आक्रमक झाले. वास्तविक पोलिसांनी त्या ठिकाणी ग्रामस्थांना बोलावलेच का? तेही महीलाना बोलावले कशाला, असा संतप्त सवाल करुन शेवटी या सर्वांचा जाब विचारण्यासाठी एक निवेदन तयार करुन मंगळवार ८ जानेवारी रोजी कसबा ते संगमेश्वर पोलीस ठाण्यावर निषेध मोर्चा काढण्याचे ठरवण्यात आले. काही झाले तरी महाडीक कुंटुबाला न्याय मिळवून द्यायचाच असे ठरवून मंगळवारी दुपारी दोन वाजता कसबा चंडीका मंदीराजवळ जमून संगमेश्वर पोलीस ठाण्यात निषेध निवेदन देण्यात येईल. त्यावेळी कसबासह पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संखेने उपस्थीत राहतील, असे राजेंद्र महाडीक यांनी जाहीर केले. तसेच आरोपीचे कोणीही वकील पत्र घेऊ नये म्हणून ग्रामस्थांच्या वतीने जिल्हा वकील संघटनेला एक निवेदन देण्याचे ठरविण्यात आले. शेवटी विशाखाला श्रध्दांजली अर्पण करुन सभा संपवण्यात आली.