
सामना ऑनलाईन, मुंबई
बेस्ट वर्कर्स युनियनच्या नेतृत्वाखाली कामगार संघटनांनी येत्या 8 जानेवारीच्या मध्यरात्रीपासून बेस्टमध्ये संपाचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर आज बेस्ट आणि पालिका मुख्यालयात घडामोडींना वेग आला होता. एका बाजूला अडून बसलेले पालिका प्रशासन आणि इरेला पेटलेल्या कामगार संघटना यांच्यामुळे बेस्टवर सध्या संपाचे सावट असून मंगळवारी 8 तारखेला काय होणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
बेस्ट उपक्रमाचा वाढत चाललेला तोटा, कर्मचाऱ्यांचे पगार करणेही मुश्कील झालेले असताना बेस्ट कामगार कृती समितीने संपाचा इशारा दिला आहे. याचे पडसाद आजच्या बेस्ट समितीत उमटले. संपाच्या तोंडावर प्रशासनाने काहीच हालचाली न केल्याच्या निषेधार्थ बेस्ट समिती सभा आज तहकूब करण्यात आली. त्यानंतर घडामोडींना वेग आला. कामगार संघटनांनी महाव्यवस्थापक सुरेंद्रकुमार बागडे यांची भेट घेतली. मात्र ही चर्चा निष्फळ ठरली. त्यानंतर पालिका मुख्यालयात स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव, बेस्ट समिती अध्यक्ष आशीष चेंबूरकर यांच्या उपस्थितीत कामगार संघटनांची बैठक पार पडली. महापौर प्रिं. विश्वनाथ महाडेश्वर यांची प्रकृती ठीक नसल्यामुळे ते आज बैठक घेऊ शकले नाहीत, तर पालिका आयुक्त अजोय मेहता हेदेखील उपस्थित नव्हते. त्यामुळे आजच्या बैठकीत विशेष तोडगा निघू शकला नाही. कामगार संघटनांना त्यांच्या मागण्या घेऊन उद्या पुन्हा बोलावण्यात आल्याची माहिती यशवंत जाधव यांनी दिली. येत्या दोन दिवसांत याबाबत काहीतरी तोडगा निघेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
प्रशासनाची मेस्माची तयारी
कामगारांच्या न्याय्य मागण्या सोडवण्यासाठी काहीही प्रयत्न न करणाऱ्या प्रशासनाने हा संप दडपून टाकण्यासाठी मात्र मेस्मा लावण्याची तयारी सुरू केली आहे. त्यामुळे येत्या 8 तारखेला संप झाल्यास कामगारांना फटका बसू शकतो. दरम्यान, बेस्ट वर्कर्स युनियनने संप अटळ असल्याचे म्हटले आहे.
कामगार सेना कृती समितीत नाही, पण नैतिक पाठिंबा
संपाची हाक देणाऱ्या कृती समितीत कामगार सेना समाविष्ट नाही. मात्र कामगारांच्या मागण्या रास्त आहेत. त्यामुळे या आंदोलनाला आमचा नैतिक पाठिंबा आहे. प्रशासनाने कामगारांना बोनस देण्यासंदर्भात किंवा अन्य मागण्यांसंदर्भात काहीच पावले उचलली नाहीत तर मात्र आमचा नाइलाज होईल-सुहास सामंत, अध्यक्ष कामगार सेना
संप टळावा यासाठी प्रयत्नशील
पालिका आयुक्तांनी दिलेला कृती आराखडा आम्ही मंजूर केला. मान्यताप्राप्त युनियनला प्रशासनाने विचारात न घेल्यामुळे ते कोर्टात गेले. त्यामुळे सगळ्याच सुधारणा अडकून बसल्या. आता आयुक्तांनी अख्ख्या बेस्ट उपक्रमाला वेठीस धरू नये. संपामुळे बेस्टचे एक दिवसाचे तीन ते साडेतीन कोटींचे नुकसान होईल. सामान्य मुंबईकरांना त्रासाला सामोरे जावे लागेल. त्यामुळे हा संप होऊ नये, असाच आमचा प्रयत्न आहे- आशीष चेंबूरकर, अध्यक्ष, बेस्ट समिती
आयुक्तांवर कोणाचा दबाव आहे का?
बेस्टचा तोटा भरून काढण्यासाठी बेस्टचा अर्थसंकल्प पालिकेच्या अर्थसंकल्पात विलीन करण्याचा प्रस्ताव आम्ही सभागृहात मंजूर केला. मग आयुक्त हा प्रस्ताव नगरविकास विभागाकडे का पाठवत नाहीत. प्रशासनाची ही दुटप्पी भूमिका संशयास्पद आहे. सभागृहाने घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी वेगाने का होत नाही, याचा आम्ही जाब विचारू. आयुक्तांवर कोणाचा दबाव आहे का?-यशवंत जाधव, स्थायी समिती अध्यक्ष





























































