
सामना प्रतिनिधी । ठाणे
मी एटीएस अधिकारी आहे. काही दहशतवादी इथेच लपून बसल्याची खबर आहे. मला कार भाड्य़ाने हवी असे सांगून कार चोऱ्या करणाऱ्या एका तोतयाच्या मुसक्या खंडणीविरोधी पथकाने आवळल्या आहेत. राजेश उपाध्याय असे या भामटय़ाचे नाव आहे.
पावणे सहा फूट उंची, गोरा वर्ण आणि दणकट शरीरयष्टी असलेला राजेश उपाध्याय हा उलवे येथे राहतो. पैसे कमवण्यासाठी त्याने कारचोरी करण्याची शक्कल लढवली. खाकी पॅण्ट आणि पोलिसांसारखे लालबूट घालून त्याने दहशतवादविरोधी पथकातील अधिकारी असल्याची बतावणी केली. पवई येथील एका ट्रव्हल एजंटकडे जाऊन राजेश उपाध्यायने स्वतः पोलीस अधिकारी असल्याची ‘पॅसेट’ वाजवली. इथे परिसरात दहशतवादी लपल्याची टीप आम्हाला मिळाली आहे. त्यासाठी एक कार तातडीने द्या असे त्याने सांगितले. त्याचे व्यक्तिमत्त्व व वेशभूषा पाहून ट्रव्हल एजंटने त्याला कार दिली. त्यानंतर राजेश उपाध्याय बेपत्ता झाला.
ठाण्याच्या खंडणीविरोधी पथकाचे प्रमुख प्रदीप शर्मा यांना खबऱ्याने कार चोर उपाध्याय उलवेत लपून बसल्याची टीप दिली. त्यानंतर खंडणीविरोधी पथकाने त्याला शोधून पवई पोलिसांच्या हवाली केले. उपाध्याय याने अशा प्रकारे काही कार चोरल्याची कबुली दिली आहे.































































