अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या जवानावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। चापोली

मष्णेरवाडी येथील सैन्य दलातील जवान सूर्यकांत टाळकुटे यांचा मंगळवारी अपघाती मृत्यू झाला. त्यानंतर बुधवारी मष्णेरवाडी येथे सायंकाळी साडे पाच वाजण्याच्या सुमारास शासकीय इतमामात टाळकुटे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

लेह लडाख येथे सैन्य दलात कार्यरत असलेले जवान सुर्यकांत टाळकुटे हे एक महिन्याच्या सुट्टीवर गावी आले होते. ते शनिवारी आपले देशसेवेचे कर्तव्य बजावण्यासाठी परत जाणार होते. मात्र मंगळवारी चापोली ते चाकूर दरम्यान झालेल्या कार व मोटारसायकल अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना मष्णेरवाडी येथे कळताच गावावर शोककळा पसरली होती. बुधवारी टाळकुटे यांचा मृतदेह मष्णेरवाडी येथे आणण्यात आला. सायंकाळी साडे पाच वाजण्याच्या सुमारास नगर येथील सैन्य दलाच्या वतीने हवेत गोळ्यांच्या फैरी झाडून टाळकुटे यांना मानवंदना देण्यात आली. टाळकुटे पार्थिवास त्यांचे वडील कोंडीबा टाळकुटे यांनी मुखाग्नी दिली. यावेळी तहसीलदार भारत सूर्यवंशी, माजी जिल्हा परिषद बांधकाम व आरोग्य सभापती डॉ. नारायणराव चाटे, सिनेट सदस्य युवराज पाटील, तसेच गावातील नागरिकही जवानाला श्रद्धांजली वाहण्यासाठी मोठया संख्येने उपस्थित होते.