
संजीवनी धुरी-जाधव,[email protected]
लोकशाहीर बशीर मोमीन-कवठेकर… ज्येष्ठ कलाकार… संपूर्ण हयात त्यांनी लोककलेला समर्पित केली… त्यांच्या साहित्यावर पीएचडी केली जाते… त्यांना नुकताच “विठाबाई नारायणगावकर जीवन गौरव पुरस्कार’ जाहीर झाला आहे…. त्यानिमित्ताने त्यांच्याशी झालेला संवाद…
आजची शाहिरी ही संपुष्टात आलेली आहे. शाहिरी कलेकडे आता दुर्लक्ष होत चालले आहे. वास्तविक शाहिरी जगली पाहिजे आणि ती जिवंत ठेवण्यासाठी अनेकांनी खूप प्रयत्न केले. पण लोकांची मानसिकता कोणी बदलू शकले नाही. पूर्वीचे रसिक प्रेक्षक आता होणे नाही. ज्या लोककलेच्या माध्यमातून मी प्रयत्न केले तमाशात गण, गवळण झाल्यानंतर पोवाडा असायचा. तो ऐकण्यासाठी प्रेक्षक आतूर असायचे. पण आजची परिस्थिती अशी आहे की, लोक गण-गवळणही पूर्ण पाहत नाहीत. त्यांची ऐकण्याची मानसिकता राहिलेली नसल्याची खंत बशीर मोमिन कवठेकर यांनी व्यक्त केली. पुढे ते म्हणतात, शाहिरी लोककला हा चिंतेचा विषय बनली आहे. लोक ऐकत नाही आणि तमाशामध्येही काळानुरुप बदल झाला आहे. लोकांना पाहिजे तेच द्यावे लागते काळाप्रमाने गीतं बदलली पण पूर्वीच्या गीतांमध्ये जे प्रबोधन असायचे ते मात्र आता दिसत नाही. आता साहित्य लिहिले जातेय, पण ते ऐकायला आणि गायला कोणी नाही. त्यावेळी संगीतरत्न दत्ता महाडिक यांनी गीतांना लावलेली चाल सुंदर असायची, लोक समरस व्हायचे.काळानुसार लिखाणात आधुनिकता आली, अजूनही लावणी तमाशा ठराविक वर्गापुरताच मर्यादित आहे.
याबाबत त्यांना विचारता ते म्हणाले, आता लावण्यादेखील पूर्वीसारख्या राहिलेल्या नाहीत. त्या नाहीशा होत चालल्या आहेत. कारण तमाशा क्षेत्रात कोणी चाली लावणारे राहिलेले नाही. मी लिहिलेल्या दीडशे ते दोनशे लावण्या चालीअभावी तशाच आहेत. काय करायचे याचा प्रश्न पडला आहे. माझी इच्छा आहे की, किमान शासनाने त्या प्रकाशित कराव्यात. मला पैशांची अपेक्षा नाही, पण त्या लावण्या प्रकाशित झाल्या तर ते साहित्य जतन होईल.
बशीर मोमीन पुढे म्हणाले की, आता वगनाटय़ ऐकणारी लोकंही राहिलेली नाहीत. त्यामुळे पूर्वी महिनाभर आधी वगनाटय़ाची तालीम घेतली जायची. पाहणारे रसिक प्रेक्षक असायचे. हल्ली तमाशाला संगीत द्यायला संगीतकार नाहीत. संगीत चांगले असले, तर लोकांना ऐकायलाही आवडते. संगीत हा गीताचा आत्मा आहे. शब्दांना जिवंत करण्याचे काम संगीताकडे आहे. दत्ता महाडिक यांनी गीतांचे सोने केले. जितकी गीतं त्यांना दिली त्यांनी कष्ट करून ती बसवली आणि लोकांपर्यंत पोहोचली. तसे आता कुणी राहिलेले नाही. तमाशा गीतांना संगीत देणारे कुणी नसल्यामुळे ती गीतं घ्यायला कोणी तयार नसल्याचेही दुःख ते व्यक्त करतात.
काळाच्या ओघात सगळंच हळूहळू हरवत चालल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. मी सगळ्या प्रकारचे लिहितो. प्रबोधनपर लिहीत होतो, काही विडंबनं लिहीत होतो. त्यामुळे ग्रामीण जीवनाचा आत्मा असलेले ग्रामीण शब्द जिवंत राहत होते. आपले ग्रामीण शब्द लोकांपर्यंत पोहोचावेत. त्या शब्दांमध्ये अस्सल मजा असते, असे बशीर मोमीन यांना वाटते.
अन्य कलांच्या तुलनेत लोककलेला फार वाईट दिवस आहेत. रघुवीर खेडकर, कांताबाई सातारकर हे प्रसिद्ध तमाशा कलावंत होते पण आता नवीन कलावंत व्हायला मागत नाही. तमाशाकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टीकोण बदलेला नाही. तमाशाचे फड जवळपास बंदच होत चालले आहेत. बोटावर मोजण्याइतकेच शिल्लक आहेत. त्यातही आता तमाशा जिवंत ठेवण्यासाठी थोडी जुनी थोडी नवी गाणी, त्यात कोटय़ा घेऊन वेगवेगळे प्रयत्न केले जात आहेत, असे त्यांचे म्हणणे आहे.
महाडिक यांच्या चालीमुळे खरी ओळख
मी गण, गवळण, लावणी, वगनाटय़ जे तमाशाला पाहिजे ते सगळं लिहायचो पण मला खरी प्रसिद्धी मिळाली ती संगीतरत्न दत्ता महाडिक यांच्या गीताने. ते स्वतः गीतांना चाली लावायचे. ती गीतं लोकांना आवडायची. माझ्या अनेक गीतांना त्यांनी चाल लावली आहे, आठ-पंधरा दिवस घेऊन त्यांना ते चांगली चाल लावायचे. त्यांची गीतं सुंदर व्हायची. माझ्या साहित्यावर चाकणचे प्रा. दिलीप कारवारी कसबे यांनी पी.एचडी. केली. ज्याच्यावर पीएचडी केली जाते तो माणूस हयात नसतो, पण मी जिवंत असल्यामुळे पुणे विद्यापिठाने सत्कार केला. आपल्या साहित्यावर पीएचडी झाली, त्या माध्यमातून आपण जिवंतच राहू यापेक्षा वेगळा आनंद काय आहे.
पूर्वीचे रसिक आता होणे नाही
एके काळी वगनाटय़ गाजायचे. त्यावेळी तर लोकं सकाळ होईपर्यंत ते पाहायला असायचे. पूर्वीची वगनाटय़ ही सुरुवातीला धार्मिक आणि पौराणिक होती. त्यावेळेला प्रेक्षकही तसेच असायचे. जीव ओतून त्यात समरस व्हायचे. कान देऊन ऐकायचे. काळ बदलला ऐतिहासिक आले. त्यानंतर सामाजिक आले तेही लोकांनी ऐकले, पण आता लोकांची कोणत्याच प्रकारची वगनाटय़ ऐकण्याची मानसिकता नाही, त्यामुळे आताची वगनाटय़ जास्तीत जास्त दोन तास चालतात. पूर्वी पहाटेपर्यंत लोक जागायचे. त्यावेळी दहा-पंधरा किलोमीटरवरून लोकं यायची. तंबू लागायचे. त्यापेक्षा जास्त जागा गाडय़ा, घोडय़ांनी व्यापली जायची. पण आता तो रसिक प्रेक्षक राहिला नाही.
























































