
सामना प्रतिनिधी, नांदुर्गा
औसा तालुक्यातील नांदुर्गा येथील सामाजिक वनीकरणामार्फतची रोपवाटिका पाणी टंचाईचे कारण दाखवून स्थलांतरीत करण्यात येत आहे. यामुळे अनेकजण रोजगारापासून वंचित होणार आहेत.
औसा तालुक्यातील नांदुर्गा येथे २०१६ साली सामाजिक वनीकरण विभागामार्फत मध्यवर्ती रोपवाटीकेची सुरुवात करण्यात आली होती. यावेळी नांदुर्गा येथील गावठाण व भूकंपग्रस्त जागेतून सहा ते सात एकर जमीन ही मध्यवर्ती रोपवाटिकेसाठी संपादन करण्यात आली होती. या जागेमध्ये पाण्यासाठी दोन बोअर घेण्यात आले असून या रोपवाटिकेच्या माध्यमातून जवळपास दीडशे मजूर कामास होते. परंतु मागील दोन महिन्यापासून पाणी नसल्याचे कारण दाखवित नांदुर्गा येथील रोपवाटीका ही दापेगाव येथे हलविण्याचे काम सध्या सुरू आहे.
सदरील रोपवाटिकेसाठी लागणारे पाणी हे निलंगा जाणाऱ्या पाईपलाईनद्वारे अगदी सहज घेता आले असते. परंतु वनीकरण विभागाकडुन कसलीही उपाययोजना आखण्यात आली नसून सदरील रोपवाटिका ही कोणाच्या सांगण्यावरून हलविण्यात येत आहे हा प्रश्न गुलदस्त्यातच आहे. या स्थलांतरामुळे दीडशे लोकांच्या रोजगारावर कुऱ्हाड कोसळणार असल्याने कामगारामध्ये नाराजी दिसत आहे. या रोपवाटीकेमध्ये सध्या नऊ लाख पाचशे रोपे जिवंत असून शासनामार्फत लाखो रुपये खर्च करून तयार केलेली रोपे ही स्थलांतर करताना खराब होत असल्याचे दिसून येत आहेत. परंतु योग्य त्या कागदपत्राची पुर्तता करून रोपवाटीकेसाठी लागणारे पाणी हे घेता आले असते.
शासनाचेच पाणी शासनाला मिळत नसेल तर सर्वसामान्याची काय गय असा सवाल यावेळी कामगारांनी केला. विशेष म्हणजे रोपवाटीका स्थलांतर करीत असल्याचे नांदुर्गा ग्रामपंचायतला लेखी कळविण्यात आलेले नसून संबंधित अधिकारी यांनी कोणाच्या सांगण्यावरून रोपवाटीका हलवली जात आहे हा प्रश्न अनुत्तीर्ण आहे. यावेळी सबंधित अधिकारी, वनपाल यांच्याकडे विचारणा केली असता समाधानकारक उत्तरे मिळाले नाहीत. म्हणूनच या मागे कांहीतरी गौडबंगाल आसल्याचे समजते.
























































