
सामना ऑनलाईन । मुंबई
विधान परिषदेचे माजी सभापती आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवाजीराव देशमुख यांचे सोमवारी निधन झाले. मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये त्यांची प्राणज्योत मालवली. ते 86 वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवाजीराव देशमुख यांनी गृह, ग्रामविकास यासारखी अनेक महत्वाची खाती सांभाळली आहेत. वसंतदादा पाटील राज्याचे मुख्यमंत्री असताना गृह राज्यमंत्री म्हणून त्यांचा प्रथम मंत्रीमंडळात समावेश झाला होता. सांगलीतल्या कोकरुड येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.
शिवाजीराव देशमुख हे किडनीच्या आजाराने त्रस्त होते. त्यांच्यावर उपचार सुरू होते. बॉम्बे रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. शिवाजीराव देशमुख यांचा 1 सप्टेंबर 1935 मध्ये जन्म झाला होता. शिवाजीराव देशमुख यांचा पुत्र सत्यजित काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस आहेत.काँग्रेसशी एकनिष्ठ असलेल्या आणि प्रदीर्घ प्रशासकीय अनुभव असलेले नेते अशी त्यांची ओळख होती. शिराळा मतदारसंघातून सलग तीन वेळा आमदार म्हणून ते निवडून आले होते. त्यांनी गृह, ग्रामविकास, सार्वजनिक बांधकाम, आरोग्य अशा महत्त्वाच्या खात्याचे मंत्री म्हणून त्यांनी काम पाहिले आहे.
1992 ते 1996 मध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्यात मंत्री अशी दुहेरी जबाबदारी त्यांनी पार पाडली होती. 1996 मध्ये एक जबाबदारी स्वीकारण्याबाबत पक्षाचा निर्णय झाल्यावर, त्यांनी पक्षकार्य करण्याचे ठरवलं. 1996 साली त्यांनी विधानसभा लढवली नव्हती. 1999 नंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या काळात त्यांनी विधानपरिषदेचे सभापतीपद भूषवले होते.





























































