
सामना प्रतिनिधी। नांदेड
-शेतकरी अडचणीत आहे, तो संकटात आहे, सरकारच्या योजना शेतकऱ्यांच्या पदरात पडल्या नाहीत, अनेकांना कर्जमाफी झाली नाही, याबाबत आमचे सरकारशी भांडण सुरुच आहे, आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत, मात्र दुष्काळाचे व अडचणी न सुटण्याचे राजकारण न करता शेतकऱ्यांच्या मदतीसाठी आम्ही धावून आलो आहोत, अकाली पडलेला दुष्काळ आणि त्यामुळे हैराण झालेला शेतकरी स्वतःच्या कुटुंबियांसोबतच आपले पशूधन वाचविण्याचा प्रयत्न करत आहे. या सर्वांना धीर देण्यासाठी मराठवाड्यातील नांदेड,परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या जनावरांसाठी पशूधन घेवून आलो आहे, धीर सोडू नका, आत्महत्या करु नका, तुम्हाला कुठलीही अडचण आल्यास शिवसेना तुमच्या पाठिशी खंबीरपणे उभी आहे, विश्वास ठेवा, असे आवाहन शिवसेना नेता तथा युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी आज येथे केले.
आदित्य ठाकरे यांनी नांदेड जिल्ह्यातील वरवट, नवरदेवाची वाडी, कळमनुरी तालुक्यातील साळवा, बाळापूर तालुक्यातील कांडली,कळमनुरी तालुक्यातील तोंडापूर, नांदेड जिल्ह्यातील तुप्पा आणि काकांडी येथील दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावर्षी ऑक्टोबर महिन्यापासून पाऊस न झाल्याने शेतकरी हतबल आहे. आपल्या कुटुंबीयांची गुजराण कशी होणार याची चिंता त्याला लागली आहे. अजून सहा महिने बाकी आहेत, अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी जगायचे कसे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. मराठवाड्यात भीषण दुष्काळ निर्माण झाला आहे, शासनाच्या योजना कुठल्या आल्या, त्याचा किती जणांना लाभ मिळाला, पिकविमा आला की नाही, शेतकऱ्यांचे कर्ज माफ झाले की नाही, या सर्व प्रश्नांची उत्तरे नकारार्थी मिळत आहेत. यासाठी आमचे सरकारशी भांडण सुरुच आहे, मात्र दुष्काळात सापडलेल्या शेतकऱ्यांना न्याय देता यावा, त्यांना कुठली तरी मदत करता यावी, यासाठी हा माझा दौरा आहे. तुम्हाला भेटून धीर देण्यासाठी, तुमचे मनोबल उंचावण्यासाठी मी येथे आलो आहे, कुठलीही अडचण आल्यास जवळच्या शिवसैनिकांना सांगा, आमच्या पदाधिकाऱ्यांना सांगा, पण बाबांनो आत्महत्या करु नका, आपला जीव विनाकारण त्यागू नका, तुमच्या पाठिशी शिवसेना खंबीरपणे उभी आहे.
शिवसेनाप्रमुखांचा नातू म्हणून मी आज तुम्हाला शब्द देतो की, मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या पाठिशी आम्ही कुठलेही राजकारण न करता खंबीरपणे उभे राहू, मला शेतीतले काही कळत नाही, मी शहरी बाबू आहे, मात्र शेतकऱ्यांच्या व्यथा आज मी जाणून घेतल्या त्या भयानक आहेत, त्यांचे दुःख खरोखरच अत्यंत भयावह आहे. वारंवार पडणारा दुष्काळ, सततची नापिकी यामुळे त्रस्त झालेला शेतकरी चिंतेत आहे. मात्र तुम्हाला माझे कळकळीचे आवाहन आहे, कोणीही आत्महत्या करू नका, पुरेल एवढे पशूखाद्य आम्ही सोबत आणले आहे. खंबीरपणे या दुष्काळाशी सामना करण्यासाठी सज्ज व्हा, शिवसेना काहीही कमी पडू देणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या दौऱ्यात सचिव वरुण सरनाईक, सिध्देश कदम, पूर्वेस सरनाईक, कोअर कमिटीचे सदस्य विपूल पिंगळे, डॉ.गणेश राजे भोसले, नांदेडचे विस्तारक अमीत गिते, शिवसेना आमदार हेमंत पाटील, आ. नागेश पाटील आष्टीकर, आ.जयप्रकाश मुंदडा, आ.दिप्लन बाजोरीया, शिवसेनेचे नांदेड,हिंगोली जिल्ह्याचे संपर्वâप्रमुख आनंद जाधव, जिल्हाप्रमुख दत्ता पाटील कोकाटे, आनंदराव बोंढारकर, उमेश मुंडे, सहसंपर्वâप्रमुख प्रकाश मारावार, भुजंग पाटील, जिल्हा समन्वयक बाबूराव कदम, नगरसेवक बालाजी कल्याणकर, युवासेनेचे जिल्हा युवाधिकारी माधव पावडे, महेश खेडकर, कृष्णा पाटील आष्टीकर यांच्यासह नांदेड, हिंगोली जिल्ह्यातील शिवसेनेचे पदाधिकारी, युवासेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
कांडली ता.बाळापूर येथील अवधूत भारती यांच्या शेतात जावून तेथील पिकांची बिकट अवस्था त्यांनी पाहिली. उभे पीक आता वाळून गेले आहे. अशा परिस्थितीत कसे जगायचे, अशा भावना तेथे उपस्थित असलेल्या शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या. यावेळी देखील तेथील शेतकऱ्यांना शिवसेना नेता आदित्य ठाकरे यांनी धीर दिला. समोरच्या गावाच्या कडेला असलेल्या नामदेव विठ्ठलराव पानपट्टे यांच्या झोपडीत जावून देखील तेथील दोन एकर शेती असलेल्या कुटुंबियांची विचारपूस केली. त्यांच्याकडे असलेल्या पशूधनाची आस्थेवाईकपणे चौकशी केली आणि त्या कुटुंबीयांना देखील धीर दिला.





























































