
सामना प्रतिनिधी । हिंगोली
हिंगोलीचे खासदार राजीव सातव यांना संसदेतील अष्टपैलू कामगिरीसाठी सलग चौथ्यांदा संसदरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. तामिळनाडूतील राजभवनात राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण होणार आहे. चेन्नईतील प्राईम पॉइंट फाऊंडेशनच्या वतीने 2009 पासुन दरवर्षी लोकसभेतील विविध कामगिरीसाठी चार जणांना पुरस्कार देण्यात येतो. यंदाच्या या पुरस्कारासाठी खासदार राजीव सातव यांची निवड करण्यात आली आहे. यासोबतच विविध गटातुन राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे, शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांची निवड करण्यात आली आहे. या पुरस्कार निवड समितीत केंद्रीय गृहराज्यमंत्री खासदार हंसराज आहिर, केंद्रीय राज्यमंत्री खासदार अर्जुन मेघवाल, शिवसेनेचे खासदार आनंदराव अडसुळ यांचा समावेश आहे. तामिळनाडु येथील राजभवनात 19 जानेवारी रोजी हा पुरस्कार वितरित करण्यात येणार आहे. या पारितोषक वितरण सोहळ्यास तामिळनाडूचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित, केंद्रीय राज्यमंत्री अर्जुन मेघवाल, केंद्रीय राज्यमंत्री पी.पी चौधरी, आयआयटी मद्रासचे संचालक डॉ. भास्कर राममुर्ती, प्राईम पाइंटचे अध्यक्ष के. श्रीनीवास आदी मान्यवरांची उपस्थीती राहणार आहे.



























































