
सामना ऑनलाईन । अॅडलेड
अॅडलेड वन डेमध्ये कर्णधार विराट कोहलीच्या शतकी आणि फिनिशर धोनीच्या अर्धशतकीय खेळीच्या जोरावर टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा शेवटच्या षटकात पराभव केला. टीम इंडियाने या विजयासह तीन सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरीही साधली.
अॅडलेड वन डेमध्ये प्रेक्षकांना जुना धोनी पाहायला मिळाला. शेवटच्या षटकात टीम इंडियाला विजयासाठी 6 चेंडूत 7 धावांची आवश्यकता असताना धोनी षटकात खेचत सामना एका चेंडूत फिरवला. या सामन्यात धोनीने शेवटपर्यंत नाबाद राहात 55 धावा केल्या आणि टीम इंडियाला 6 विकेट्सने विजय मिळवून दिला. धोनीच्या या कामगिरीवर कर्णधार विराट प्रचंड आनंदी दिसला. सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये विराटने धोनीचे विशेष कौतुकही केले. विराटने धोनीच्या या खेळीला ‘एमएस क्लासिक’ असे म्हटले.
धोनीचे कौतुक करताना विराट म्हणाला की, 50 षटकं यष्टीरक्षण केल्याननंतर अशी मॅचविनिंग खेळी करणे सोपे नाही. धोनीने सामना शेवटपर्यंत खेचला आणि विजयाने शेवट केला. धोनीच्या डोक्यात काय सुरू असते हे फक्त त्यालाच माहिती आहे, असेही विराट म्हणाला. धोनीला आपल्या क्षमतेवर पूर्ण विश्वास होता की मोठे फटके मारून सामना जिंकू शकतो.
विराटने 14 चेंडूत 25 धावांची खेळी करणाऱ्या दिनेश कार्तिकचेही कौतुक केले. कार्तिकने वेगाने धावा करत धोनीवर दबाव कमी केला, असे विराट म्हणाला.




























































