
सामना ऑनलाईन । ऍडलेड
कर्णधार विराट कोहलीचे धडाकेबाज 39वे शतक… महेंद्रसिंह धोनीचे दमदार अर्धशतक… अन् भुवनेश्वरकुमार व मोहम्मद शमी यांनी अखेरच्या टप्प्यात केलेल्या प्रभावी गोलंदाजीच्या जोरावर हिंदुस्थानने मंगळवारी येथे झालेल्या दुसऱ्या वन डे लढतीत यजमान ऑस्ट्रेलियावर सहा गडी व चार चेंडू राखून विजय मिळवला आणि तीन वन डे सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली. यावेळी शतकवीर विराट कोहलीची सामनावीर म्हणून निवड करण्यात आली.
299 धावांचा पाठलाग करताना शिखर धवन (32 धावा) व रोहित शर्मा (43 धावा) यांनी 47 धावांची भागीदारी रचली. पण जेसन बेहरेनडॉर्फच्या गोलंदाजीवर शिखर धवन बाद झाला आणि जोडी तुटली. त्यानंतर रोहित शर्मा व विराट कोहलींने 54 धावांची भागीदारी रचली. रोहित बाद झाल्यावर ग्लेन मॅक्सवेलच्या गोलंदाजीवर हाणामारी करण्याच्या नादात अंबाती रायुडू 24 धावांवर बाद झाला. विराट कोहली व महेंद्रसिंह धोनी यांनी चौथ्या विकेटसाठी 82 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी रचली. विराट कोहलीने दोन षटकार व पाच चौकारांसह 104 धावांची शानदार खेळी साकारली. जाय रिचर्डसनच्या गोलंदाजीवर तो बाद झाला. पण महेंद्रसिंह धोनी (55) व दिनेश कार्तिक (25) या जोडीने विजयावर शिक्कामोर्तब केले.































































