
सामना प्रतिनिधी। उरण
उरण आणि पर्यायाने रायगडचे अनेक पिढ्यांचे स्वप्न असलेल्या करंजा येथील मच्छिमार बंदराच्या विस्तरणीकरणाचे भूमिपूजन गुरुवारी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून केंद्रीय रस्ते परिवहन, राजमार्ग आणि जहाज वाहतूक, जलसंपदा मंत्री नितीन गडकरी, राज्याचे वित्त व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार, रायगडचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, सिडकोचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी उपस्थिती असणार आहे.
करंजा बंदराचे काम मागील सहा वर्षांपासून रखडले आहे. तत्कालीन केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या कारकिर्दीत ८६ कोटी खर्चाचे काम समुद्राच्या तळाशी अवघड खडक लागल्याने रखडले आहे. खडक फोडून बंदर उभारणीसाठी अतिरिक्त १५० कोटी खर्च शासनाकडून वेळेत उपलब्ध होऊ शकला नाही. त्यामुळे निधी अभावी अद्ययावत करंजा बंदराचे काम मागील सहा वर्षांपासून रखडले आहे.
दरम्यान रखडलेल्या करंजा मच्छिमार बंदराचा विस्तार आणि मच्छिमार बांधवांचा विकास झाला पाहिजे, यासाठी करंजा मच्छीमार संस्थेचे अध्यक्ष शिवदास नाखवा,माजी अध्यक्ष प्रदीप नाखवा यांनी जेएनपीटीचे विश्वस्त महेश बालदी यांच्या मदतीने केंद्र व राज्य सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला. त्या अनुषंगाने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सागरमाला योजनेतून ७५ कोटी रुपये व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि वित्त व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ७५ कोटी रुपये असा एकूण १५० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला.
सुमारे ८०० मच्छीमार बोटी लँडिंग करण्यासाठी भव्य बंदर, आधुनिक बांधकाम, जेटी, मार्गदर्शक स्तंभ, इलेक्ट्रॉनिक्स यंत्रणा, मत्स्य उद्योगासाठी वाहतूक, स्टोअरेज आदी सुविधांनी हे मच्छीमार बंदर सुसज्ज असणार आहे. करंजा बंदराच्या उभारणीमुळे मुंबईतील ससून डाँक बंदरावरील वाढता ताण कमी होणार आहे.तसेच रायगड जिल्ह्यातील हजारो मच्छीमारांसाठीही हे बंदर वरदानच ठरणार आहे.त्यामुळे रखडलेल्या करंजा बंदराचे काम पूर्णत्वास जाण्याची सर्वच मच्छीमारांना प्रतिक्षा लागुन राहिलेली आहे.
पश्चिम किनाऱ्यावरील महत्वाच्या या बंदराच्या भूमिपूजन सोहळ्यास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
































































