
सामना प्रतिनिधी । मुंबई
लोकांच्या मदतीसाठी वेळीअवेळी धावून जाणाऱया शिवसैनिकांनी जोगेश्वरीत एका वेडय़ाला माणसात आणले. जोगेश्वरी पूर्वेला सर्वोदयनगर येथील बालविकास विद्यामंदिर शाळेसमोर रस्त्याच्या कडेला बसून वेडे चाळे आणि घाण करणाऱया या इसमाला एका संस्थेच्या मदतीने आश्रय मिळवून दिला आहे. या वेडय़ाचे रस्त्यावरील बस्तान हलल्यामुळे विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी मात्र सुटकेचा निःश्वास टाकला आहे.
जोगेश्वरीच्या सर्वोदयनगरमध्ये गेल्या सात-आठ महिन्यांपासून एक निराधार मनोरुग्ण रस्त्याच्या कडेला बसलेला दिसायचा. अंदाजे 55 वर्षांचा हा इसम असून मागील काही वर्षांपासून तो जोगेश्वरीमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आपले बस्तान मांडतो. लोकांनी हाकलले की दुसरीकडे जातो. गेल्या काही दिवसांपासून त्याने शाळेसमोरच्या रस्त्यावर आपला मुक्काम ठोकला होता. जवळच्या बसस्टॉपवर त्याचा वावर असे. त्याच्या वेडय़ा चाळ्यांमुळे शाळेचे विद्यार्थी, पालक, नागरिक, प्रवासी यांच्यात दहशत पसरली होती. स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा मेघवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.
अखेर नागरिकांनी शिवसेनेचे स्थानिक नगरसेवक अनंत नर यांना याबाबत सांगितले तेव्हा नर यांनी शिवसैनिकांच्या मदतीने त्या व्यक्तीच्या कुटुंबीयांचा शोध घेण्यास सुरुवात केली. मात्र या व्यक्तीच्या कुटुंबातील कोणतीही व्यक्ती समोर आली नाही. अखेर नर यांनी अज्ञात व्यक्तीला सुरक्षितस्थळी पुनर्वसन करण्याचा निर्णय घेतला.
सुरत येथील आश्रमाने अज्ञात वृद्धाची सांभाळ करण्याची जबाबदारी स्वीकारली. गुजरात राज्यातील सुरत (कतारगाम) येथील ‘जीएजा मानव सेवा जीवदया ट्रस्ट’च्या आश्रमातील लोकांनी या वृद्धाला आंघोळ घालून त्याला नवीन कपडे घालून अक्षरशः माणसात आणले. या व्यक्तीचे नाव, पत्ता मात्र अद्याप समजू शकलेला नाही. ट्रस्टच्या सदस्यांसोबत शिवसेनेच्या रुग्णवाहिकेतून त्याला सुरतच्या आश्रमात पाठवण्यात आले.
आश्रमाच्या सदस्याकडे अज्ञात व्यक्तीला सुपूर्द करण्यात आले. नगरसेवक अनंत नर यांनी यावेळी ट्रस्टला आर्थिक मदतही केली. या वृद्धाची पालनपोषण, देखभाल, राहण्याची व्यवस्था आश्रम करणार आहे. यावेळी शिवसेनेचे प्रभाग 77 चे शाखाप्रमुख नंदू ताम्हणकर, सुहास खामकर, सुनील महस्कर, स्वप्नील सांवत, रवी सोगम, रमेश राणे, तुषार देवरुखकर, बाबू धामापूरकर, विलास जाधव, सचिन गावकर, भाऊ वाडकर, वणू हंस, शैलेश बांदेलकर, दीपक नार्वेकर उपस्थित होते.



























































