बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचे गणेशपूजन, स्मारकाचे ताबापत्र उद्धव ठाकरे यांना सुपूर्द

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या भव्य स्मारकासाठी महापौर बंगल्याच्या जागेचे हस्तांतरण ‘बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक समिती’कडे करण्यात आले. अत्यंत पवित्र वातावरणात पार पडलेल्या गणेशपूजनाने स्मारकाच्या कामाचा आज श्रीगणेशा झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी महापौर बंगल्याच्या जागेचे ताबापत्र आणि करारनामा स्मारक न्यासाचे अध्यक्ष शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपूर्द केला.

महापौर बंगल्यातील हॉलमध्ये शिवसेनाप्रमुखांच्या भव्य तसबिरीसमोर गणेशपूजनाचा सोहळा पार पडला. अत्यंत भावपूर्ण वातावरणात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत श्री गजाननाची आरती करण्यात आली. यावेळी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, सौ. रश्मी ठाकरे उपस्थित होते. गणेशपूजनानंतर महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे बंगल्याच्या जागेचे ताबापत्र व करारनामा सुपूर्द केला. यावेळी स्मारक समितीचे सदस्य सचिव शिवसेना नेते उद्योगमंत्री सुभाष देसाई, परिवहनमंत्री दिवाकर रावते, खासदार गजानन कीर्तिकर, सुधीर जोशी, ऍड. लीलाधर डाके, पर्यावरणमंत्री रामदास कदम, सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे, खासदार चंद्रकांत खैरे, महापौर विश्वनाथ महाडेश्वर, पालिका सभागृह नेत्या विशाखा राऊत, उपनेते खासदार अरविंद सावंत, उपनेत्या आमदार नीलम गोऱहे, गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर, विजय शिवतारे, गुलाबराव पाटील, दादा भुसे, अर्जुन खोतकर, उपमहापौर हेमांगी वरळीकर, स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव, बेस्ट समिती अध्यक्ष आशीष चेंबूरकर यांच्यासह खासदार, आमदार आदी उपस्थित होते.