
सामना ऑनलाईन। नवी दिल्ली
चिकन,मटन, अंडी व मासे खाणाऱ्या मांसाहारींसाठी खुश खबर आहे. शाकाहारी महिलांच्या तुलनेत मांसाहारी महिला अधिक सुदृढ असतात. त्यांना गंभीर आजार होण्याचा धोकाही कमी असतो. असे नुकत्याच एका संशोधनातून समोर आले आहे. नवी दिल्लीतील एम्स रुग्णालय (AIIMS)आणि शेरे-कश्मीर इन्स्टीट्यूट ऑफ मेडिकल सायन्स (SKIMS) मधील संशोधकांनी हे संशोधन केले आहे.
या दोन्ही संस्था 2015 पासून शाकाहार, मांसाहार व त्यांचे महिलांच्या शरीरावर होणारे परिणाम यावर संशोधन करत असून 2018 मध्ये हे संशोधन पूर्ण झाले. नुकताच या संशोधनाचा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्यात मांसाहार करणाऱ्या महिलांमध्ये हृद्याशी संबंधित आजार, स्थूलपणा, हायपरटेंशन,कॅन्सर, यकृताशी संबंधित आजार यासारखे आजार होताना दिसत नाहीत. पण शाकाहारी महिलांमध्ये मात्र या आजाराचे प्रमाण अधिक असल्याचे अहवालात सांगण्यात आले आहे. AIIMS आणि SKIMS मधील संशोधकांनी हे संशोधन करण्यासाठी दिल्ली व कश्मीर येथील एकूण 464 महिलांवर संशोधन केले होते. त्यांच्या खाण्यापिण्याच्या सवयी, त्यांना असलेले आजार, याचबरोबर त्यांच्या इतर वैद्यकीय तपासण्याही करण्यात आल्या. त्यासाठी त्यांना 72 तासांचे डाएट पॅटर्न देण्यात आले होते. तपासणीत मांसाहार खाणाऱ्या कश्मीरमधील महिला दिल्लीतील महिलांच्या तुलनेत अधिक सुदृढ असल्याचे आढळले.






















































