
सामना प्रतिनिधी । नागपूर
राज्यमंत्री यांच्या निर्णयाविरूदध कॅबिनेट मंत्री यांचेकडे अपील करण्याची तरतुद कायद्यात नसतानासुध्दा बेकायदेशीररीत्या दुकानाचा निलंबीत परवाना बहाल करणाऱ्या अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीष बापट यांचा तात्काळ राजीनामा मुख्यमंत्री यांनी घ्यावा अशी मागणी माजी मंत्री अन्न, नागरी पुरवठा मंत्री अनिल देशमुख यांनी केली.
बीड जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानाचा परवाना निलंबित केल्याबाबतच्या याचिकेत राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीष बापट यांना नोटीस बजावण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपीठाचे न्या. सुनील पी. देशमुख यांनी दिले आहेत.
दुकानाचा परवाना निलंबीत करणारा जिल्हा पुरवठा अधिकारी यांचा आदेश तसेच तो आदेश कायम करणारा उपायुक्त आणि राज्य मंत्री यांचा आदेश नागरी पुरवठामंत्री गिरीष बापट यांनी रद्रद केला होता. जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी चार नोव्हेंबर 2015 रोजी दुकानाचा परवाना निलंबीत केला. त्या आदेशाविरूद्धचे दुकानदाराचे अपील उपायुक्त (पुरवठा) यांनी फेटाळले. त्या विरूदधचा पुनर्विलोकन अर्ज अन्न व नागरी पुरवठा व गाहक संस्थेचे राज्यमंत्री रवींद्र चव्हान यांनी सुध्दा फेटाळला. त्यानंतर दुकानदाराने नागरी पुरवठामंत्री बापट यांच्याकडे पुनर्विचार याचिका दाखल केली असता त्यांनी दुकानदाराचा परवाना बहाल केला. तसेच जिल्हा पुरवठा अधिकारी, उपायुक्त आणि राज्यमंत्री यांचा आदेश बेकायदेशीररीत्या रद्द केला.


























































