दुचाकी वरून पडून ट्रॅक्टर खाली आल्यामुळे युवक ठार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । हदगांव

भाऊराव साखर कारखान्यावर रात्रपाळीसाठी जाणाऱ्या दोन तरुणांची दुचाकी रस्त्याच्या कडेला उभी असतांना बाजूने जाणाऱ्या ट्रॅक्टरचा धक्का लागून दुचाकीवर पाठीमागे बसलेला लक्ष्मण रामराव शिंदे (३०) रा. धानोरा हा युवक दुचाकीवरून पडल्यामुळे ट्रॉलीखाली चेंगरून जागीच ठार झाला. तर दुचाकी चालक धनंजय काळे हा किरकोळ जखमी झाला. ही घटना काल रात्री उशीरा घडली.

धानोरा येथून लक्ष्मण शिंदे व धनंजय काळे हे दोघे भाऊराव सहकारी साखर कारखान्याच्या युनीट क्र. चार अर्थात हदगांव शहराजवळील हडसणी येथील काखान्यात रात्रपाळीसाठी आपल्या दुचाकीवरून गावाकडून जात होते. हदगांव शहरातील हुतात्मा स्मारकासमोर आल्यावर दुचाकी चालक धनंजय काळे याने आपल्या दुचाकीची गती कमी केली व दुभाजकाला लागून गाडी थांबवली परंतु पाठीमागून वेगात येणाऱ्या ट्रॅक्टरची गती दोन ट्रॉली असल्यामुळे नियंत्रित होवू शकली नाही. परिणामी दुभाजकाच्या व ट्रॉलीच्या मध्ये आलेल्या दुचाकीला धक्का लागल्यामुळे दुचाकीवर पाठीमागे बसलेला युवक लक्ष्मण शिंदे हा युवक पडल्यामुळे मागच्या ट्रॉलीखाली आला. लोकांनी त्या दोघांनाही येथील उपजिल्हा रुग्णालयात नेले. तेथील कर्तव्यावर असलेल्या वैद्यकिय अधिकारी डॉ.सुनिल अग्रवाल यांनी तपासून मृत घोषीत केले. मयत लक्ष्मण रामराव शिंदे हा एकुलता एक असून त्याच्या पश्चात आई, वडील व तीन मली आहेत.