
सामना ऑनलाईन । बहराइच
हिंदुस्थान नेपाळसीमेजवळील एका गावात धर्मपरिवर्तनाची घटना उघड झाल्याने खळबळ माजली आहे. सीमेजवळील रुपईडीहा क्षेत्रातील केवलपूर मजरा रानीपूरवा गावात धर्म परिवर्तनासाठी प्रलोभन दाखवणाऱ्या एका पादरीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या भागात याआधीही धर्म परिवर्तनाच्या घटना घडल्याने उघड झाले आहे. सीमाभागात ख्रिश्चन मिशनऱ्यांचे चर्च आहे. त्यांच्याकडून प्रेम सेवा नावाचे रुग्णालय चालवण्यात येते. अनेक स्थानिक येथे औषधोपचारासाठी येतात. त्यांना प्रलोभन दाखवून धर्मपरिवर्तन करण्यात येत असल्याचे उघड झाले आहे.
रानीपुरवा गावातील रमेश गौतम पत्नी आरतीदेवीला उपचारासाठी या रुग्णालयात घेऊन आला होता. त्यावेळी चर्चचा पादरी रमेश यांच्याजवळ आला आणि म्हणाला. तुमच्या पत्नीच्या शरीरात अनेक भुते आहेत. त्यांना मोठी भूतबाधा झाली आहे. या बाधेवर उपचार करण्यासाठी नेपाळी गावातील जैसपूर येथील आपल्या घरी पादरीने रमेशला बोलावले. आरती यांच्यावर उपचार करण्यासाठी आपण प्रभू येशू यांना प्रार्थना करू असे त्याने रमेश यांना सांगितले. रमेश आपल्या पत्नीसह पादरीच्या घरी गेला असता, आपण कोणताही उपचार करणार नसून तुम्ही फक्त प्रभू येशूची प्रार्थना करा, ते तुम्हाला या संकटातून बाहेर काढतील असे त्याने रमेशला सांगितले. पत्नीची तब्येत सुधारण्यासाठी पादरीच्या प्रलोभनांना भूलून रमेशने पत्नी, आई-वडिल आणि मुलांसह ख्रिश्चन धर्म स्वीकारला. धर्म परिवर्तनानंतर त्याच्या घरातील सर्व मूर्त्या हटवण्यात आल्या.
गावकऱ्यांना याबाबत समजल्यानंतर त्यांनी पोलिसांना कळवले. रमेश पादरीच्या संपर्कात आल्यानंतर त्याच्यात बदल झाल्याचे गावकऱ्यांनी सांगितले. आपल्या पत्नीला आता फक्त प्रभू येशूच वाचवू शकतात, असे रमेश नेहमी सांगत होता. पादरीने आपल्याला येशूवर विश्वास ठेवण्यास सांगितले आहे, असेही तो गावकऱ्यांना म्हणाला. गावकऱ्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी तपास केला. प्राथमिक तपासात पादरीने रमेशला प्रलोभन दाखवून त्याच्यासह त्याच्या कुटुंबाचे धर्म परिवर्तन केल्याचे दिसून आले. पोलिसांनी पादरीविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.
























































