लेख – काळा रंग : न समजणारे गणित

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>>प्रा . चंद्रकांत चन्ने<<

विज्ञानाच्या ठायी काळ्या रंगाला एक अनन्यसाधारण महत्त्व आहे. आत्यंतिक उष्णता निर्मित करणारा हा रंग. थंडीत काळ्या रंगांच्या कपडय़ांना नेहमीच प्राधान्य असते. शरीराचे तापमान कायमच स्थायी ठेवण्याचं काम करतात. ग्रामीण चुलीवर स्वयंपाकाची भांडी खालून काळ्या करडय़ा रंगाच्या लेपणाने उष्णता शोषण्याचे काम करतात. सहजपणे जीवनाचा अविभाज्य अंग असणाऱ्या काळ्याला मात्र जाणीवपूर्वक दूर ठेवले जाते…हे न समजणारे गणित आहे.

विज्ञानाच्या ठायी काळा हा रंग नाही. अरंग आहे. ज्याला स्वतःचे असे नेमके अस्तित्व नाही. रंगाच्या बैठकीत तो वर्ज्य आहे. तो वेगळा आहे, तो एकटा आहे. जीवनाच्या ठायी तर तो त्याहूनही वर्ज्य आहे. तो शुभ नाही, तो अशुभ आहे. तो वेगळा आहे, तो एकटा आहे.

कलाक्षेत्रात येण्याआधी आणि आल्यानंतर या दोन ‘काळा वर्ज्य’ असलेल्या भ्रामक संकल्पनेचा सामना सततच करावा लागला. बहुतेकांनी तो रीतसर अंगीकारलादेखील. तसे या संकल्पनेचे कलाक्षेत्राला फारसे नुकसान झाले नाही. परंतु जीवनाच्या ठायी मात्र या समजुतीने प्रचंड उलथापालथ केली.

विश्वभारती येथील टागोरांच्या शांतिनिकेतनात मात्र या दोन्ही संकल्पना अजिबात मान्य नाहीत. कलाअभ्यास करताना त्या कलाभवनाच्या आवारात त्याचे एक वेगळेच महत्त्व आणि प्रभुत्व होते. ‘श्यामली’ या दत्तक शब्दाने त्याचा वापर करण्याचे सामर्थ्य तेथील बहुतेक सर्वच कलाकारांनी मान्य केले. अंगीकारले. श्यामली ही कलाभवनाच्या अगदी समोरच उभारलेली, ग्रामीण वास्तुकलेच्या अनुषंगाने जाणारी, आतून-बाहेरून काळा डौल मिरविणारी, नंदलाल बोसांची वास्तू. कलेच्या क्षेत्रातील अजरामर अशी कलाकृती म्हणून डौलात उभी आहे. अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना वसतीगृह म्हणून वापरू देण्यात येते सध्या. आपणही या काळ्या विशाल आभासात काही दिवस काढले ही कल्पनाच ही ‘काळा अंतरंग’ आणि त्याची अनुभूती विस्तारित करण्यास माझ्यासाठी कारणीभूत ठरली. त्या वास्तुसमोर क्षणभर उभे राहून तमाम रंगावर अधिराज्य गाजविणारी ही श्यामली तुम्हाला एका शांत अन चैतन्यमय वातावरणाची प्रचीती ना देऊन गेली तरच नवल.

काळा म्हणजे ‘अंतरंग.’ अंतरंग… माझ्या आईचं उदर. ज्या उदरात समस्त विश्वाची निर्मिती होते… मग तो अपशकुनी कसा? संपूर्ण विश्व सामावून घेण्याचे सामर्थ्य असणाऱ्या या काळ्या उदराला कलाक्षेत्र आणि सामान्य जीवनाने सुद्धा अव्हेरावे हे मला अजिबात मान्य नाही. उदरातून प्रसवणारी ही वेदनाच नाही तर त्या वेदनेचा आनंद म्हणजे काळा रंग.

कृष्ण काळा आणि राम सावळा. नामदेवाने सांगितलेली काचोळी ही काळीच, त्याची रात्रही काळीच, घागरही काळी आणि यमुनेचे पाणी हेही काळेच. काळ्या विठ्ठलाच्या ओढीने कित्येक मैल पायी चालणाऱ्या भाविकांची आस ही काळीच. कलामांच्या भाषेतील बालभविष्य घडविणारा फळाही काळाच. आईचे पावित्र्य राखणारा हा काळा.

ऐ अंधेरे! देख तेरा मुँह काला हो गया

माँ ने आँखे खोल दी, घर मे उजाला हो गया!

कलाक्षेत्रातील 50 वर्षे एक चित्रकार म्हणून काळा ही माझ्या अनुभवांची सांगड आहे. मग एक कलावंत म्हणून हे भोवतालचे संपूर्ण जग मला कुठल्या रंगात बघायला आवडेल असं कुणी विचारले तर मी म्हणेल ‘काळा अंतरंगात’ ती अनुभूती आहे माझ्या आईच्या अस्तित्वाची. पिकासोची काळी गुरनिका, रेम्ब्राचा black devine light, नंदलाल बोस, के. जी. सुब्रमण्यम, सोमनाथ होर, जयराम पटेल यांसारख्या दिग्गज कलाकारांची श्यामली हे कलाक्षेत्रातील मैलाचे काळे दगडच आहेत.

बहिनाबाईच्या हळुवार कविता मला सततच काळ्या रंगाची अनुभूती देत आली आहे. ‘ती आई होती म्हणूनी, घनव्याकुळ मीही रडलो’ हे ग्रेसांचे शब्द म्हणजे काळ्या विवरातील जीवनाची प्रचंड आभास जाणीव आहे.

हिंदुस्थानी पद्वतीत वास्तविक काळा रंग हा खोलवर रुजलेल्या परंपरांचा समकक्ष आहे. आध्यात्मिक साहित्य आणि पुराण यांचे तो प्रतिनिधित्व करतो. दुर्दैवाने सम्पूर्ण विश्वाला खऱ्या अर्थाने न समजलेला हा काळा त्यांच्या अपूया साधनेचा द्योतक आहे. वास्तविक काळा हा प्रकाशाच्या निर्मितेचं एक महत्त्वाचे साधन असून….हिंदुस्थान प्रबोधन विचारकांनी ते सहजपणे मान्यही केले आहे.

काळा. सामान्य हिंदुस्थानींचे प्रतिबिंब, हिंदुस्थानी समाजाचे प्रतिनिधित्व. आध्यात्मिक संकल्पनेच्या दूर, परंतु खऱ्या अर्थाने निष्पाप, वास्तव. प्रामाणिक अस्तित्व आणि परिश्रमाचे प्रतीक. चित्रकार म्हणून माझ्या मेंदूचा अविभाज्य घटक म्हणूनच मी काळ्या रंगाकडे पाहात आलो आहे. तसा अनुभवीतही आलो आहे. दगडासारखा दृढ़निश्चयाची प्रचीती त्यापासून मी घेत राहिलो आहे. असे असताना कॅनव्हासवरील काळी तरलता माझ्यातील बालसंवेदनेला पुरकच ठरत गेली आहे. माझं बालपण माझ्या चित्रप्रवासाचे अविभाज्य अंग आहे आणि ते काळ्या अनुभूतीत रंगविणे एक अवर्णनीय आनंद आहे. एका कवीने काळ्या रंगाची खालील सुंदरशा शब्दात वर्णिली आहे.

Black is as beautiful as you holding your baby for the very first time.

Black is as beautiful as saying I miss you.

Black is as beautiful as going fishing with your dad.

Black is as beautiful as calling your mother on her birthday.

ही काळी संवेदना हाताळण्याचे सामर्थ्य मला कायमच येवो याची धडपड माझ्या कला प्रवासात मी सातत्याने करीत राहिलो आहे. शुभ-अशुभाच्या संवेदना काळ्या रंगाला कलाजगतातही हद्दपार करून चुकले याचे मनस्वी वाईट वाटते. वास्तविक काळा रंग आहे म्हणून पांढऱ्या रंगाला महत्त्व आहे. रात्रीच्या काळय़ा अंधारामुळेच दिवसाच्या लख्ॊख उजेडाचं महत्त्व पटून येते.

मकरसंक्रांत… आवर्जून घातल्या जाणाऱ्या काळय़ा साडय़ा… एक शुभ सण… संक्रमणाचा. काळय़ा साडय़ा, छोटय़ांना काळे कपडे, काळी तीट, काळं काजळ, काळा दोरा… अशुभ मानल्या जाणारा काळा….बाळाला दृष्ट लागू नये म्हणून गालावर विराजमान होतो. बाळाचं गोडपण आणखीनच खुलवितो. उत्तर…काळोखाचा अंत आणि प्रकाशाची सुरुवात… प्रकाशाची सुरुवात ही काळय़ा गर्भातच होते. मग प्रभुत्व कुणाचे? शुभ कोण? की दुःखाचा अंत आणि सुखाची नांदी?

आत्म्याला शांती मिळावी म्हणून काळा कावळा आपल्या समाजात अग्रगण्य. पिंडाला स्पर्श करण्यासाठी त्याचे अग्रस्थान मान्य करणारा हा समाज हे विसरून जातो की, माझी जन्ममाती काळीच आणि समाजाला साक्षर करणारे अक्षर हेसुद्धा काळय़ा पार्श्वभूमीवरीलच. मग पांढरा शांतीचा आणि काळा निषेधाचा कसा काय? कृष्णकृत्य म्हणून आम्ही आपल्याला सर्वाधिक प्रिय असणाऱ्या कृष्ण प्रतिमेला डाग लावतो याचं भानही नसतं.

विज्ञानाच्या ठायी काळ्या रंगाला एक अनन्यसाधारण महत्त्व आहे. आत्यंतिक उष्णता निर्मित करणारा हा रंग. थंडीत काळ्या रंगांच्या कपडय़ांना नेहमीच प्राधान्य असते. शरीराचे तापमान कायमच स्थायी ठेवण्याचं काम करतात. ग्रामीण चुलीवर स्वयंपाकाची भांडी खालून काळ्या करडय़ा रंगाच्या लेपणाने उष्णता शोषण्याचे काम करतात. सहजपणे जीवनाचा अविभाज्य अंग असणाऱ्या काळ्याला मात्र जाणीवपूर्वक दूर ठेवले जाते…हे न समजणारे गणित आहे.

काळा. शुभ-अशुभ संकेत. श्रेष्ठत्व… गौणत्व. सामान्य समज. असामान्य चित्रवापर. अशा संकल्पनेतील काळा रंग आज नव्या तरुण पीढीचा आवडता रंग होत चालला आहे याचा मनस्वी आनंद आहे.