
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
उत्तरेकडील राज्यांमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी सुरू असून याचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची झुंबड उडाली आहे. उत्तराखंडमध्ये निसर्गाचे अनोखे रुप पाहायला मिळत असून केदारनाथ, बद्रीनाथ आणि गंगोत्री-यमुनोत्री धामसह पर्वतीय भागात बर्फाची चादर अंथरली गेली आहे. यामुळे येथील वातावरण आल्हाददायक झाले आहे.
बुधवारी आणि गुरुवारी बद्रीनाथ धाम, हेमकुंड साहिब, रुद्रानाथ, नंदा घुंघतीसह नीती व माणा खोऱ्यात बर्फवृष्टी झाली. यामुळे येथील तापमानातही घट झाली आहे. पर्यटकांनी या बर्षवृष्टीचा आनंद लुटला असला तरी यामुळे स्थानिकांचे मात्र हाल होत आहेत. घरासमोर, गाड्यांवर सर्वत्र दोन ते तीन फुटांपेक्षा जास्त बर्फ साचल्याने तो हटवताना दमछाक होत आहे.
























































