सत्तेला बळी जाणारं वास्तव

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> माधुरी महाशब्दे

मानवी मन अनेक विकारांनी युक्त असते. विकारांवर, अवगुणांवर, विचाराने, विवेकाने मात करणं कठीण वाटलं तरी अशक्य नसतं. माणसाला बुद्धीची ईश्वरदत्त देणगी आहे. त्याचा उपयोग सदाचार, विवेक, विधायक कार्य यासाठी करणं यात माणसाचं हित असतं. धर्म, अर्थ काम हे मानवी जीवनातील तीन महत्त्वाचे टप्पे. अर्थ व काम यांच्या आहारी गेल्यास त्याचा प्रवास विनाशाकडे होत राहतो. प्रस्तुत पुस्तकात लेखकाने माणसाच्या सत्ता, संपत्तीलोलुप, हव्यासी प्रवृत्तीला कारणीभूत ठरणाऱ्या ‘अॅफलूएन्सा’ या रोगाचे परिणाम सांगितले आहेत.

‘सागर’ हा कदंबरीचा नायक ऐहिक सुखाच्या आहारी गेलेला सुखलोलुप, अहंकारी, गर्विष्ठ, क्रूर आहे. सरिता ही कादंबरीची नायिका मध्यमवर्गीय संस्कारात वाढलेली तरुणी. कॅन्सरग्रस्त पित्याचं प्रायोपवेशन, भावाचं महागडं शिक्षण, गरिबी अशा परिस्थितीत आईच्या इच्छेनुसार सागरसारख्या धनवानाच्या मागणीला होकार देते. हा निर्णय तिचं आयुष्यच बदलून टाकतो. या निर्णयानंतर बदललेलं तिचं आयुष्य, आजुबाजुच्या जगाविषयी बदललेला तिचा दृष्टिकोन अशा साऱया गोष्टी आपणही अनुभवू लागतो. स्त्रीजीवनातील त्याग, तिचं समर्पण आणि यानंतर तिला झालेली स्वत्वाची जाणीव हा सारा परीघ आपल्याला या कादंबरीत पाहायला मिळतो. कादंबरीत तत्कालीन सामाजिक परिस्थिती कुटुंबातील स्त्रीचे स्थान, शिक्षण, जागतिकीकरणाचे वारे वाहू लागल्याच्या खुणा, रूढीप्रिय मध्यमवर्ग, स्त्रीची होणारी ससेहोलपट, पुरुषी मनोवृत्ती, धनिक वर्गाचं चित्रण सारं अनुषंगानं येतं.

सागर हा स्वकष्टातील ऐश्वर्य प्राप्त केलेला गर्विष्ठ, क्रूर, हिंसक, अहंमन्य, मध्यमवर्गाला तुच्छ मानणारा धनिक वर्गाचं प्रतिनिधित्व करतो. सरिताची फसवणूक करून तिचं केलेलं अॅबॉर्शन, दुसऱया पुरुषापासून अपत्यप्राप्ती (पुत्रप्राप्ती) करून घेण्याची विकृत इच्छा ही हीन वृत्ती दिसून येते. यामुळे सरितामधील स्त्री, माता चवताळून उठते. जागृत होते. तिला स्वत्वाची जाणीव प्रकर्षाने होते यासाठी तिला तिचा दादा व मानसोपचारतज्ञ डॉ. आनंद यांचा पाठिंबा मिळतो. तिच्यामधली कणखर, स्वत्वाची जाणीव झालेली स्त्री जागृत होते. सोन्याच्या पिंजऱयातून ती बाहेर पडते. तिला जाणवतं की सागर बदललेला नाही. त्याने फक्त मुखवटा घेतला होता. या जाणिवेने ती आमूलाग्र बदलते.

‘तुझ्यासारखं आत्मबळ प्रत्येक स्त्रीमध्ये असावं. विवाहविषयीची मते बुद्धिप्रधान असावीत. एकमेकांबद्दल ओढ असावी, प्रेम असावं, तिचा व्यक्तिविकास व्हावा, तीव्र झाला असेल तेव्हा झडझडून भेटावं. केवळ संपत्ती आहे, वंशावळ वाढविण्यासाठी जवळ यावं यातून बाहेर पडायला हवं. या डॉ. आनंदच्या विचारातून सरितालाच नव्हे तर आजच्या स्त्रीला पिंजऱ्यातून भरारी घेऊन मुलं, स्वतंत्र आयुष्य जगण्याचं धैर्य मिळतं. सागरसारख्या घातक भयानक मनोवृत्तीच्या माणसांना ज्ञानेश्वरांनी आंधळय़ा गरूडाची उपमा दिली आहे त्याचा प्रत्यय येतो.

आंधळय़ा गरूडाच्या छायेत
लेखक – श्रीकांत मुळे
पृष्ठे – 170,
मूल्य – 250 रु.