नरेंद्र मोदींनी फक्त 14 मिनिटांत भाषण संपवले; वाचा सविस्तर…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । कोलकाता

पश्चिम बंगालमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी सभा घेऊन ममता बॅनर्जी सरकारवर चौफेर हल्ला चढवला. मोदींच्या या सभेसाठी तुफान गर्दी झाली होती. या गर्दीमुळे चेंगराचेंगरी होण्याच्या भीतीमुळे मोदींनी अवघ्या 14 मिनिटांत भाषण आटोपते घेतले. जनेतेने दाखवलेल्या प्रेमाबाबत त्यांनी जनतेचे आभार मानले.

या सभेला झालेली गर्दी बघून आपल्या लक्षात आले की, पश्चिम बंगालमधील ममता बॅनर्जी यांचे सरकार हिंसाचार का घडवत आहे. भाजपबाबत जनतेचे प्रेम वाढत आहे. त्यामुळे लोकशाही वाचवण्याचे ढोंग करणाऱ्या सरकारने निर्दोष जनतेच्या हत्येचे सत्र सुरू केल्याचा आरोप त्यांनी केला. पंतप्रधानांच्या ठाकूर नगरमधील सभेला होत असलेल्या वाढत्या गर्दीमुळे चेंगराचेंगरी होण्याची शक्यता निर्माण झाली. त्यामुळे मोदी यांनी भाषण आटोपते घेत फक्त 14 मिनिटात भाषण संपवले. मात्र, 14 मिनिटांच्या भाषणात त्यांनी ममता बॅनर्जी यांच्या सरकारवर चौफेर टीका केली.

पश्चिम बंगालमधील गावांची स्थिती अंत्यत खराब आहे. या सरकारने गावांच्या विकासाकडे लक्ष दिलेले नाही. केंद्र सरकार गावांचा विकास करण्याचा प्रयत्न करत आहे. स्वातंत्र्यानंतर 70 वर्षांत येथील गावांचा विकास झाला नाही, ही खेदाची गोष्ट आहे. आम्ही हे चित्र बदलणार आहोत. आता देशात एकही गाव विकासाशिवाय राहणार नाही, असे ते म्हणाले. केंद्र सरकारने अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी तरतूद केल्याचे त्यांनी सांगितले. काँग्रेसची शेतकरी कर्जमाफी फसवी असल्याचा आरोपही त्यांनी केला. याचा फायदा फक्त मूठभर शेतकऱ्यांना होणार आहे. मते मिळवण्यासाठी काँग्रेसने शेतकरी कर्जमाफीचा वापर केल्याचे त्यांनी सांगितले.

पंतप्रधानांचे भाषण सुरू असताना गर्दीमुळे अनेकजण धक्काबुक्की करत होते. सभेला प्रचंड गर्दी झाली आहे, त्यामुळे ही जागा कमी पडत आहे. त्यामुळे जनतेला होणाऱ्या त्रासाची कल्पना आपल्याला आहे. जनतेने शांत राहून सहकार्य करावे, असे आवाहन पंतप्रधानांनी केले. मात्र, सभेत गोंधळ सुरूच राहिल्याने चेंगराचेंगरी होण्याच्या भीतीने मोदींनी भाषण आवरते घेतले.