मौज प्रकाशनचे संजय भागवत यांचे निधन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, मुंबई

मौज प्रकाशनचे संचालक संजय भागवत यांचे रविवारी दीर्घ आजाराने ठाणे येथे निधन झाले. ते 60 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे. त्यांच्यावर सोमवारी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

संजय भागवत हे गेली काही वर्षे पक्षाघाताच्या आजाराने त्रस्त होते. अलीकडेच त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाली. त्यानंतर त्यांची प्रकृती ढासळत असल्याने त्यांना ठाणे येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथेच हृदयविकाराच्या धक्क्याने त्यांची प्राणज्योत आज मालवली.

संजय भागवत यांनी मौज प्रकाशनाची धुरा 1997 ते 2015 पर्यंत सांभाळली. श्री. पु. भागवत यांच्यानंतर मौजची सूत्रे संजय यांच्याकडे आली. त्यांच्या काळात वेगळ्या धाटणीचे लिखाण मौजतर्फे प्रकाशित झाले. निळू दामले, अचला जोशी, मीना प्रभू, भानू काळे असे लेखक मौजशी त्यांनी जोडले. डॉ. लता काटदरे यांच्यासारख्या व्यक्तींना त्यांनी लिहिते केले. संजय यांचा स्वभाव अत्यंत मितभाषी आणि मृदू होता. अनेक मराठी पुस्तक व्यावसायिकांच्या आर्थिक अडचणी जाणून त्यांच्या पाठिशी ते उभे राहिले.