दरोडा टाकून महिलेचा खून करणाऱ्या दरोडेखोरांना जन्मठेप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । संभाजीनगर

तुळजापूर तालुक्यातील यमगरवाडीतील शेतवस्तीवरील सरवदे आणि जोगदंड कुटुंबावर जम्या आणि सुऱ्याने हल्ला केला व महिलेचा खून करणाऱ्या तीन दरोडेखोरा मोक्काचे विशेष न्यायाधीश के. आर. चौधरी यांनी दोषी ठरवून दरोडा आणि मोक्का गुन्ह्यामध्ये जन्मठेप व विविध कलमाखाली शिक्षा, दंड ठोठविला.

तुळजापूर तालुक्यातील यमगारवाडी शेत शिवारामध्ये जयाजी खंडू सरवदे (45) हे पीकाला पाणी देत होते. त्यांच्या शेजारी राहणारे सखाराम जोगदंड यांची देखील शेती आहे ते दोघ जण 13 डिसेंबर 2014 रोजी पिकाला रात्री नऊच्या सुमारास पाणी देत होते. जोगदंडचे पाणी देणे संपल्यामुळे जेवण करण्यासाठी मोबाईल करून सरवदे यांना वस्तीवर बोलवले. जयाजी खंडू सरवदे, पांडूरंग जोगदंड, साखाराम जोगदंड हे तिघजण जेवण करत बसले होते तर काशीबाई पांडूरंग जोगदंड ह्या पत्र्याच्या शेड मध्ये भाकरी करत होत्या. वस्तीच्या दिशेने पाच ते सात जण आले आणि शिवीगाळ करत मोबाईल, पैसाची मागणी केली त्यावेळी जयाजी यांनी विरोध त्यावेळी त्या दरोडेखोरांनी सुरा, जम्या आणि लोखंडी गजाने मारहाण केली. जयाजीला मारहाण होत असल्यामूळे पांडुरंग, सखाराम आणि काशीबाई जोगदंड या तिघांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता याच्यावर देखील प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात काशीबाई पांडूरंग जोगदंड ह्या गंभीर जखमी होऊन जागीच गतप्राण झाल्या होत्या तर ते तिघे गंभीर जखमी झाले होते. काशीबाई रक्ताच्या थारोळ्यात निचपत पडल्या असताना देखील दरोडेखोरांनी त्याच्या गळ्यातील मंगळसूत्र, घरातील रोख रक्कम असा 19 हजाराचा ऐवजे बळजबरीने हिसकावून नेला. जखमी तिघांना उपचारासाठी सोलापूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. जयाजी सरवदे यांच्या तक्रारीवरुन तामनवाडी पोलीस ठाण्यात सात दरोडेखोरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

तीन दरोडेखोर गजाआड

गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस उपनिरक्षक शेख यांनी तपास करून 18 डिसेंबर रोजी पंम्प्या दामू शिंदे (30 रा. मानमोडी ता. तुळजापूर), बालाजी शिवाजी काळे (32 बसंवतवाडी ता. तुळजापूर) आणि टुन्या ऊर्फ प्रेमचंद दामू शिंदे (32 मानमोडी ता. तुळजापूर) या तिघांना गजाआड केले. या गुन्ह्याचा तपास करताना महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी कायद्याअंतर्गत गुन्हा केल्याचे सिद्ध झाल्यामुळे त्याच्याविरोधात मोक्का अंतर्गत गुन्हा दाखल केला. पंम्प्या, बालाजी, टुन्या, भाऊसाहेब मधुकर पवार (रा.वडशिवनी ता करमाळा), प्रभू मोतीराम पवार (रा. ढोक बाभूळगाव), विलास लक्ष्मण भोसले (रा.सिदगाव ता. तुळजापूर) आणि शैल्या आठेल्या शिंदे (निलेगाव ता. तुळजापूर) या सातजणा विरोधोत पोलीस उपअधिक्षक मोहन विभाते यांनी तपास करुन मोक्काच्या विशेष न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.

19 साक्षीदारांचे जबाब नोंदविले

मोक्काचे विशेष न्यायाधीश के. आर. चौधरी यांच्या समोर अंतिम सुनावणी झाली असता विशेष वकील अ‍ॅड. सुदेश शिरसाठ यांनी 19 साक्षीदारांचे जबाब नोंदविले. यामध्ये जयाजी आणि पांडूरंगची साक्ष महत्वाची ठरली. न्यायालयाने पम्प्या, बालाजी आणि टुण्या या तीन दरोडेखोरांना दोषी ठरवून भादंवि 396 कलमान्वे तिघांना जन्मठेप, प्रत्येक एक हजार रुपये दंड, दंड न भरल्यास 15 दिवस साधा कारावास. भादंवि 397 कलमान्वे तिघांना प्रत्येकी सात वर्षे सक्तमजूरी, प्रत्येकी 1 हजार रुपये दंड दंड न भरल्यास 15 दिवस साधा कारावासाची शिक्षा सुनावली.

मोक्का मध्ये जन्मठेप, प्रत्येकी 1 लाख रुपये दंड

मोक्काच्या विशेष न्यायालयाने पंम्प्या, बालाजी आणि टुन्या तिघांना मोक्का 3,1(रामोनएक) कलमान्वे जन्मठेप, प्रत्येकी एक लाख रुपये दंड, दंड न भरल्यास अडिच वर्षे साधा कारावास. मोक्का 3,1,(रोमन दोन) या कलमान्वे पाच वर्षे सक्तमजूरी, प्रत्येकी एक लाख रुपये दंड, दंड न भरल्यास अडीच वर्षे साधा कारावसाची शिक्षा. मोक्का 3 आणि 3 कलमान्वे 5 वर्षे सक्तमजूरी, प्रत्येकी एक लाख रुपये दंड, दंड न भरल्यास अडिच वर्षे साधा कारावास. मोक्का 3 आणि 4 कलमान्वे तिघांना सात वर्षे सक्तमजूरी, प्रत्येकी पाच लाख रुपये दंड, दंड न भरल्यास साडेतीन वर्षे साधा कारावासाची शिक्षा सुनावली.

या गुन्ह्यात जखमी झालेल्या जयाजी सरवदे यांना 5 हजार रुपये, सखाराम आणि पांडूरंग या दोघांना प्रत्येकी एक लाख रुपये नुकसान भरपाई देण्यात यावी असे आदेशात नमुद करण्यात आले आहे. अ‍ॅड. सुदेश शिरसाठ यांना अ‍ॅड. नितीन मोने आणि अ‍ॅड. प्रिया देशपांडे यांनी सहकार्य केले.

घटना घडल्यापासून चौघे दरोडेखोर फरार

भाऊसाहेब मधुकर पवार , प्रभू मोतीराम पवार , विलास लक्ष्मण भोसले आणि शैल्या आठेल्या शिंदे हे चौघ जण घटना घडल्यापासून फरार असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आले.