
अमित खोत | मालवण
पालखी-तरंग व लवाजम्यासह हजारो भाविकांच्या उपस्थितीत मालवणात देवांची महोदया (समुद्री स्नान) पर्वणी सोमवारी पार पडली. यावेळी ढोलताशांचा गजर व सनाईच्या सुराने मालवण नगरी गजबजून गेली. देवतांनी स्नान केल्यानंतर भाविकांनी समुद्र स्नान केले. दरम्यान मालवणात दाखल झालेल्या देव-देवतांच्या व भाविकांच्या उपस्थितीने दांडी मोरयाचा धोंडा समुद्रकिनारी कुंभ मेळा भरल्याचे चित्र दिसून आले.
सकाळी ८ वाजल्या पासून दुपारी उशिरापर्यंत समुद्र स्नानासाठी भविकाची एकच गर्दी दिसून आली. या अमृत सोहळ्यानिमित्त सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध ठिकांणच्या ग्रामदेवता समुद्र स्नानासाठी मालवण समुद्र किनारी आले. श्री मोरेश्वर तीर्थक्षेत्रावर समुद्र स्नानासाठी हजारो भाविक-भक्ताचा जनसमुदाय लोटला होता. मालवणात महोदय पर्वणीचा सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न झाला.
तीन वर्षानी प्रथमच सर्वात मोठा सोमवती अमावस्या व महोदय पर्वणी योग आल्याने मालवणात भक्तिमय वातावरण दिसून आले होते. मालवणात मोहदय पर्वणी योग निमित्त येणाऱ्या देवताच्या स्वागतासाठी मालवण नगरी सज्ज झाली होती. रविवारी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ठिक-ठिकाणची ग्रामदेवता देव देवता आपल्या रयतेसह चालत मालवण शहरात दाखल झाले. रात्री देव जागरण, भजन, नामस्मरण, भक्ताच्या संकटाचे शिवकळे द्वारे निवारण, मनोरंजनासाठी ट्रिकसीन युक्त दशावतार नाट्यप्रयोग आदि कार्यक्रम झाले.
काही देवता सकाळी समुद्र स्नाना साठी मालवणात दाखल झाले. मालवण येथील नागरिकांनी सड़ा-रांगोळी घालून, गुढ्या-तोरणे उभारून ठीक-ठिकाणी देवताचे स्वागत केले. मालवण नगरपरिषदेच्या वतीने दोन ठिकाणी महिला साठी चेंजिंग रूम, वायरी भूतनाथ ग्रामपंचायत यांच्या वतीने फिरते शौचालय, जि. प. सदस्य हरी खोबरेकर व माजी नगराध्यक्ष अशोक तोडणकर व मित्र मंडळीच्या वतीने देवता सोबत येणार्या भविकांना मोफत अल्पपोहाराची सोय करण्यात आली होती. अन्य लोकप्रतिनिधी व भविकानींही सुविधा दिल्या.
तीर्थ क्षेत्राच्या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू या साठी देवबाग ग्रा.प.च्या वतीने रुग्णवाहिका तर समुद्रात मच्छिमार बोटी व सुरक्षा रक्षक ठेवण्यात आले होते. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी मार्गावर पोलिस बंदोबस्त होता. मोठ्या आनंद उत्साहात सोमवती अमवास्या व महोदय पर्वणी समुद्र स्नानाचा सोहळा संपन्न झाला.
जिल्ह्यातील ग्रामदेवता पंचयातनानी केले समुद्र स्नान….
मालवण दांडी मोरेश्वर तीर्थक्षेत्री सोमवती अमवस्या व महोदय पर्वणी निमित्त मालवण ची ग्रामदेवता श्री देव रामेश्वर-नारायण, तिरवडेची माउली, तळगावचा रामेश्वर, पडवेचा रवळनाथ, पेंडूरचा वेताळ-सातेरी, निरुखेचा रवळनाथ, सोनवडे तर्फ हवेलीचा लिंगेश्वर, ओरोस खुर्दचा गांगेश्वर, सिंधुदुर्ग नगरीचा रवळनाथ, भडगाव बुद्रुकचा रवळनाथ, आवळेगावचा श्री देव लिंग रवळनाथ पंचायतन, वर्देची सातेरी, नांदोस गिरोबा, कुंदेची पावणाई- रवळनाथ, साळेलचा गिरोबा, सरबळची सातेरी यांनी दांडी समुद्र किनारी तर कांदळगावचे ग्रामदैवत श्री देव रामेश्वर पंचयातन, हडीचे ग्रामदैवत नागेश्वर, कालिका देवी, पावणाई, ओवळीयेचे ग्रामदैवत रामेश्वर या देवतांनी आपले भक्त व लवाजम्यासह कोळंब- सर्जेकोट येथील समुद्र किनारी महोदय पर्वणी निमित्त समुद्र स्नान केले. यासह अन्य गावातील गावरहाट्या व देव-देवतानी या महोदय पर्वणी निमित्त मंगलमयी स्नानाचा लाभ घेतला.
अन १० वर्षांनी झाली तीन देवता बंधूची गळा भेट….
प्रथमच ओवळीयेचा ग्रामदैवत श्रीदेव रामेश्वर आपल्या भक्ता सह समुद्र स्नानासाठी आला होता. यावेळी तब्बल १० वर्षांनी कांदळगावचा श्री देव रामेश्वर, हडी गावचा श्री देव नागेश्वर व ओवळीयेचा रामेश्वर या तिन्ही बंधू देवतांच्या गळा भेटीचा सोहळा विस्मरणीय ठरला.



























































