
सामना प्रतिनिधी, मुंबई
राज्यात वाहनांची संख्या 3 कोटी 29 लाखांवर गेली असून वाहतुकीतील बेदरकारपणा वाढत आहे. राज्यात मागील वर्षी सुमारे तीस हजार रस्ते अपघात झाले असून त्यात तेरा हजार जणांना प्राण गमवावे लागले. त्यापैकी 11 हजार म्हणजे 80 टक्के मृत्यू मानवी चुकांमुळे झालेले आहेत. या पार्श्वभूमीवर वाढते अपघात रोखण्यासाठी रस्ते सुरक्षेबाबत जाणीव ठेवून वाहतुकीच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन राज्याचे परिवहन मंत्री व राज्य रस्ते सुरक्षा परिषदेचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी आज केले. परिवहन विभाग आणि वाहतूक पोलीस शाखेमार्फत राज्यभरात 4 ते 10 फेब्रुवारीदरम्यान रस्ता सुरक्षा सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. या अभियानाचा शुभारंभ नरिमन पॉइंट येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये दिवाकर रावते यांच्या हस्ते करण्यात आला, त्यावेळी रावते बोलत होते.
राज्यात 2016 मध्ये 12 हजार 935, 2017 मध्ये 12 हजार 511 तर 2018 मध्ये 13 हजार 59 अपघाती मृत्यू झाले. वाहनांच्या वेगाबरोबर अपघातांची आणि त्यातील मृत्यूंची संख्या वाढत आहे. मुंबई–पुणे एक्सप्रेस वे हा तर अति वेगामुळे मृत्यूचा सापळा झाला आहे.
मृत्यूमध्ये युवकांचे प्रमाण अधिक
परिवहन आयुक्त शेखर चन्ने यावेळी म्हणाले की, राज्यात 3 कोटी 41 लाख इतके परवानाधारक वाहनचालक आहेत. राज्यात अपघातांचे प्रमाण 0.36 टक्क्याने कमी झाले असले तरी अपघाती मृत्यूचे प्रमाण मात्र 4 टक्क्यांनी वाढले आहे. पादचारी, सायकलस्वार आणि दुचाकी यांच्या अपघातांचे प्रमाण हे 66 टक्के इतके आहे. तसेच अपघाती मृत्यूमध्ये 25 ते 45 वयोगटातील व्यक्तींचे प्रमाण अधिक आहे. राज्यात 1 हजार 324 इतके ब्लॅक स्पॉट असून ते काढून टाकण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत कार्यवाही करण्यात येत आहे, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.
सुरक्षेच्या दृष्टीने दुचाकी चालकांनी हेल्मेट वापरणे आवश्यक व कायदेशीरदृष्टय़ा अनिवार्य आहे. पण शासनाने हेल्मेटची सक्ती केली असे म्हणत या चांगल्या मोहिमेबाबत अपप्रचार केला जात आहे. वृत्तपत्रांनीही या मोहिमेला ‘सक्ती’ असे न म्हणता हेल्मेटच्या आवश्यकतेबाबत जनजागृती करावी.
– दिवाकर रावते, परिवहन मंत्री

























































