मुंबईत 1000 मेगावॅट वाढीव वीज आणण्यासाठी आराखडा तयार करा!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

मुंबापुरीची विजेची मागणी वर्षाला दीडशे-पावणेदोनशे मेगावॅटने वाढत आहे. ही वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी मुंबईबाहेरून वीज आणणे अवश्यक आहे. त्या पार्श्वभूमीवर सुमारे एक हजार मेगावॅट वीज वाहून आणण्याची क्षमता असलेली खारघर-विक्रोळी अशी 400 केव्हीची उच्च दाब वीज वाहिनी टाकण्यासाठी 15 दिवसांत आराखडा सादर करा असे निर्देश महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने (एमईआरसी) महापारेषणला निर्देश दिले आहेत.

वीज आयोगाने मुंबईची विजेची वाढती मागणी लक्षात घेता 2011 मध्ये विक्रोळी-खारघर अशी 400 केव्हीची उच्च दाब वीज वाहिनी टाकण्याचे निर्देश दिले होते. त्यासाठी जवळपास 250 कोटी रुपयांच्या खर्चाला मंजुरी दिली आहे. मात्र गेल्या सात वर्षांत टाटा पॉवरने वीज वाहिनी उभारण्याबाबत कार्यवाहीच केलेली नाही. त्याची गंभीर दखल घेत वीज आयोगाने टाटा पॉवरकडून सदर काम काढून घेतले आहे. तसेच मुंबईच्या दृष्टीने महत्वपूर्ण असलेली उच्चदाब वीज वाहिनी टाकण्यासाठी आयोगाने महापारेषणला आराखडा तयार सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. ही वीज वाहिनी टाकण्यासाठी खुल्या प्रकारे निविदा मागवल्या जाणार आहेत. दरम्यान, सध्या मुंबईला टाटा पॉवरच्या ट्रॉम्बे येथील वीज प्रकल्पातून सुमारे दीड हजार मेगावॅट, अदानीच्या डहाणू येथील वीज प्रकल्पातून 500 मेगावॅट वीज मिळत असून मुंबईबाहेरून जवळपास 1500 मेगावॅट वीज वाहून आणली जात आहे. त्यामुळे साडेतीन हजार मेगावॅटपेक्षा अधिक विजेची मागणी वाढल्यास ती पूर्ण करण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे. त्याची दखल घेत आयोगाने वाढीव क्षमतेच्या वीज वाहिन्या टाकण्याच्या कामाला वेग दिला आहे.

मुंबईबाहेरून वीज आणणे काळाची गरज
मुंबईची विजेची मागणी दिवसोंदिवस वाढत आहे. ती पूर्ण करण्यासाठी मुंबईबाहेरून वाढीव वीज आणणे काळाची गरज आहे. त्यासाठी पुढील दोन-तीन वर्षांत 400 केव्हीची वीज वाहिनी टाकण्याचे काम होणे अवश्यक असल्याचे मत वीजतज्ञ डॉ. अशोक पेंडसे यांनी व्यक्त केले. सदर काम याआधीच होणे गरजेचे होते असेही त्यांनी सांगितले.