
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
मनी लाँडरिंगप्रकरणी काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांचे पती रॉबर्ट वाड्रा आज अंमलबजावणी संचालनालयासमोर (ईडी) हजर झाले. चार तास त्यांची चौकशी करण्यात आली. त्यांच्यासोबत प्रियांकाही होत्या, मात्र कार्यालयाच्या गेटवरून त्या मागे परतल्या. एखाद्या तपास यंत्रणेसमोर हजर होण्याची वाड्रा यांची ही पहिलीच वेळ आहे.
मनी लाँडरिंगप्रकरणी दिल्लीतील न्यायालयाने रॉबर्ट वाड्रा यांना 16 फेब्रुवारीपर्यंत संरक्षण दिले आहे. वाड्रा यांनी ‘ईडी’च्या चौकशीस सहकार्य करावे, तसेच 6 फेब्रुवारीला ‘ईडी’च्या कार्यालयात हजर राहावे असे आदेश वाड्रा यांना दिले होते. त्यावेळी वाड्रा लंडनमध्ये होते. आज वाड्रा ‘ईडा’च्या कार्यालयात दुपारी 3.45 वाजता हजर झाले. त्यांची चार तास चौकशी करण्यात आली. ‘ईडी’ कार्यालयात येताना प्रियांका गांधीही होत्या, मात्र त्या कार्यालयाच्या गेटवरून मागे परतल्या.
लंडनमधील ‘12, ब्रायस्टन स्कवेअर’ येथे 17 कोटी रुपयांना फ्लॅट विकत घेताना मनी लाँडरिंग झाल्याचा ‘ईडी’चा आरोप आहे. हा फ्लॅट वाड्रा यांच्या मालकीचा असल्याचा ‘ईडी’चा दावा आहे. डिसेंबर महिन्यात ‘ईडी’ने मनोज अरोरा यांच्यावर धाड टाकली होती. अरोरा हे वाड्रा यांच्या मालकीच्या स्कायलाइट हॉस्पिटॅलिटी कंपनीत कर्मचारी आहेत. दरम्यान, वाड्रा यांच्या आणखी काही मालमत्ता लंडनमध्ये असल्याचा ‘ईडी’चा दावा आहे.
मी पतीसोबत आहे – प्रियांका
काँग्रेस मुख्यालयाबाहेर पत्रकारांनी हे राजकीय सूडापोटी होत आहे का असा प्रश्न विचारल्यावर प्रियांका गांधी म्हणाल्या, ‘सर्वांनाच माहीत आहे हे सर्व कशामुळे सुरू आहे? रॉबर्ट वाड्रा हे माझे पती आहेत. कुटुंबाच्या पाठीशी मी ठामपणे उभी आहे.





























































